बिबी (ऋषी दंदाले) – किनगावजट्टू येथील शेतकर्याची तब्बल चार जनावरे चोरून पळून चाललेल्या बोलोरो पीकअप वाहनाचा मोठ्या शिताफीने पाठलाग करून बिबी पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडण्यात अगदी सिनेस्टाईल यश मिळवले आहे. तसेच, चारही जनावरांची सुखरूप सुटका केली आहे. आरोपी शेख रहीम शेख समृद्धीन (वय ३२) रा. हर्सूल ग्रीन पार्क सोसायटी, छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिस कोठडी मिळाली असून, पोलिस त्याच्याकडून इतरही जनावरे चोरीच्या घटनांचा छडा लावत आहेत.
सविस्तर असे, की परवा दि.२१ ऑक्टोबररोजी बिबी पोलिसठाणे हद्दीत एक बोलेरो पिक अप वाहन संशयितरित्या आढळून आल्याने सदर वाहनाचा पाठलाग बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील, परमेश्वर शिंदे, ना. पोको अरुण सानप, भारत ढाकणे यांनी केला असता, सदर वाहन हे दुसरबीड येथील समृद्धी महामार्गावर गेल्याने सदर वाहनाचा पाठलाग छत्रपती संभाजीनगरपर्यंत केला. छत्रपती संभाजीनगर येथे सावंगी नाका भागात पिकअप वाहन हे पोलिसांची नजर चुकवून पसार झाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे स्थानिक पोलिसांना माहिती देऊन पोलीस स्टेशन बिबीच्या पथकाने कसुरी तपास करून छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल सावंगी नाका गणोरी भागात बोलोरो पिकअप वाहन व आरोपीने चोरून नेलेली जनावरे यांचा शोध घेत असताना, जनावर चोरी करणार्या टोळीचा मोरक्या पोलिसांना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करून पोलीस स्टेशन बिबी हद्दीतील किनगावजट्टू येथील चोरून नेलेली ५ जनावरे हरसुल भागातून आरोपीच्या कब्जातून पंचासमक्ष जप्त करून मालकांच्या ताब्यात देण्यात आली. मुख्य आरोपी शेख रहीम शेख समृद्धीन वय वर्ष ३२ रा.हर्सूल ग्रीन पार्क सोसायटी यास अटक केली. या आरोपीस पोलीस कोठडीदरम्यान गुन्ह्यासंबंधाने विचारपूस करून दिनांक २३-१०-२०२४ रोजी जनावर चोरी करणारे आरोपी, चोरी करण्यासाठी वापरत असलेले बोलेरो पिकअप वाहन सेंट्रल नाका हद्दीतून जप्त करण्यात आले आहे. सदर बाबत पोलीस स्टेशन बिबी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील चोरी केलेली चार जनावरे किमत एक लाख २५ हजार रुपये व एक बोलेरो पिकअप वाहन किंमत ४ लाख रुपये असा एकूण पाच लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन बिबी येथे पोलीस कोठडीमध्ये असलेला आरोपी नामे शेख रहीम शेख खमरुद्दीन वय वर्षे ३२ रा हर्सूल ग्रीन पार्क सोसायटी छत्रपती संभाजीनगर याच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पोलीस स्टेशन बिबी येथे दाखल जनावर चोरीचे एकूण पाच गुन्हे दिनांक २८- ७ -२०२४ दाखल असलेले अप नंबर २९६/२०२४ पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे दाखल अप नंबर १४५/२०२४ पोलीस अप नंबर १६४/२०२४ पोलीस स्टेशन नंबर ४८२/२०२४ दाखल अप नंबर २१०/२०२४ पोलीस स्टेशन बिबीचे ठाणेदार यांनी उकल करून गुन्हे उघड केले आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्या संबंधाने तपास सुरू आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक विश्व पानसरे बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बि बी महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली व बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ रामेश्वर शिंदे -पोलीस हेड कॉन्स्टेबल- गजानन चतुर – ना पो का अरुण सानप- पोलीस कॉ भारत ढाकणे -पोलीस कॉ रवींद्र बोरे- पोलीस कॉ यशवंत जवळ -(सायबर सेल) ऋषिकेश खंडेराव यांनी ही कारवाई केली आहे.