Breaking newsBuldanaBULDHANAHead linesLONARMEHAKARVidharbha

आरक्षण वाचवायचे असेल तर एससी, एसटी, ओबीसींनी आपले उमेदवार विधानसभेत पाठवावे!

- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

– राजकीय पक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाकडूनही आरक्षण धोक्यात आल्याचा आंबेडकरांचा गंभीर आरोप
– मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारार्थ मेहकरात जाहीर सभा
– निवडणुकीत वाटण्यासाठी मेहकरात ४० कोटी आल्याच्या आंबेडकरांच्या दाव्याने मेहकरात खळबळ!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : आरक्षण हे घटनेचे हृदय असून, राजकीय पक्ष आणि सर्वोच्च न्यायालय अशा दोन्ही संस्थांकडून ओबीसी, एससी, एसटी समाजाचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. हे आरक्षण वाचवायचे असेल तर आपले आमदार विधानसभेत जाणे गरजेचे आहे. तेव्हा सर्व ओबीसी, एसटी, एससी समाजाने आपल्या पुढील पिढीच्या भवितव्याचा विचार करून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारार्थ आंबेडकर यांची जाहीर सभा यशवंत मैदान मेहकर येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. ध्यैर्यवर्धन पुंडकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, मेहकर तालुकाध्यक्ष मोमीन भाई, लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, रिसोड मतदारसंघातील उमेदवार प्रा. प्रशांत गोळे, सुरेश पवार, बुद्ध महासभेचे अध्यक्ष प्राध्यापक विलास शेजुळ सर, डॉ. वसंतराव वानखेडे. एडवोकेट बबनराव वानखेडे. गौतम गवई, दिलीप राठोड. महेंद्र पनाड, डोणगाव अर्बनचे संस्थापक अध्यक्ष ऋषांक चव्हाण आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी खळबळजनक आरोप करून, सर्वांना धक्का दिला. ते म्हणाले, की निवडणुकीत वाटण्यासाठी मेहकर मतदारसंघात ४० कोटी रूपये आलेले आहेत. ते वाटले जाण्यापूर्वी धाडी घाला. या पैशातून मतदानच विकत घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत भाजपने चारसौ पारचा नारा दिला. भाजपवाले चारशे पार झाले तर ते संविधान बदलू शकतात. म्हणून संविधानवादी व लोकशाहीवादी समाजाने त्यांना अर्ध्या जागांवरच रोखले. भाजपला त्यांची जागा दाखवून दिली व त्यांची सत्ता जाता जाता वाचली. त्यामुळे लोकांच्या या दणक्यामुळे भाजपच काय पण आरएसएसदेखील पुढील १०० वर्षे तरी घटना बदलण्याची भाषा करणार नाही. पंतप्रधान मोदींना तर इतका धक्का बसला आहे, की संधी मिळेल तेव्हा मोदी हे संविधान डोक्याला लावतात. आता संविधान वाचवायचा मुद्दा नाही तर आरक्षण वाचविण्याचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मागितले आहे. त्यांच्या या मागणीला भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या कोणत्याही पक्षांचा विरोध नाही. आपण मात्र भूमिका घेतली आहे, की ओबीसींच्या आरक्षणाच्या ताटात मराठ्यांना बसवू नये, ओबीसींचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे, व मराठ्यांचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे. आता विधानसभा निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्ष ओबीसींच्या ताटातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतील. म्हणून, ओबीसी बांधवांनी ठरवावे, की स्वतःचे आरक्षण वाचविण्यासाठी या राजकीय पक्षांना निवडून द्यायचे आहे, की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे? एकीकडे राजकीय पक्षांमुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे एससी व एसटीचेदेखील आरक्षण धोक्यात आलेले आहे. सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला की, एसटी व एसटीच्या आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजेत. पण, क्रिमिलेअरचे नवे तंत्र आल्याने या समाजाचे आरक्षण धोक्यात आले. एकदा फायदा घेतला, की ते कुटुंब क्रिमिलेअरमध्ये येतं, म्हणजे आरक्षणातून बाहेर पडतं. आता आरक्षण संपविण्याच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोर्चा, धरणे आंदोलने करून फायदा नाही तर त्यासाठी आपले ३० ते ४० आमदार विधानसभेत पोहोचणे गरजेचे आहे, आणि या आरक्षण संपविण्याच्या धोरणालाच तेथून विरोध करणे गरजेचे आहे. आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर नाही तर विधानसभेत लढण्याची वेळ आली आहे, असेही अ‍ॅड़. आंबेडकर यांनी यावेळी ओबीसी, एसटी, एसीवर्गाला सांगितले.
तर आपल्या भाषणात मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी महायुती व महाआघाडीच्या उमेदवारावर सडकून टीका केली. महाविकास आघाडीने परका उमेदवार या मतदारसंघात देऊन लोकांना फसवलं आहे, निवडणूक झाली, की हा उमेदवार आपला बोर्‍या-बिस्तारा उचलून मुंबईला निघून जाईल. तेव्हा स्थानिक उमेदवार पाहूनच मतदान करा. दुसरीकडे, गेली १५ वर्षे एक नकली एससी या मतदारसंघात लोकांच्या माथी मारण्यात आला. या माणसाने एका दलित समाजाच्या नेत्याला फक्त कार्यक्रमाची पास मागितली म्हणून जातीवरून अश्लील शिविगाळ केली होती, मी तुझ्या समाजाच्या मतावर निवडून आलो नाही, अशी उर्मट भाषा वापरली होती. सत्तेचा माज काय असतो, ते या नेत्याने गेली १५ वर्षे दाखवून दिले आहे. गेली १५ दिवस मी मतदारसंघात फिरते आहे, गावोगावी जाते आहे. मला कुठेही चांगले रस्ते दिसले नाहीत. पांदण रस्ते, गावरस्तेदेखील नाहीत. म्हणून, आता अशा निष्क्रिय नेत्याला घरी बसविण्याची वेळ आली आहे. बाबासाहेबांच्या संविधानासाठी, या मतदारसंघाच्या विकासासाठी मला विधानसभेत पाठवा, असे आवाहन यावेळी डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी यावेळी मतदारांना केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचीदेखील यथोचित भाषणे झाली. या सभेला मोठ्या संख्येने मतदार स्त्री, पुरूष व तरूणवर्ग उपस्थित होता. अ‍ॅड. आंबेडकर यांच्या भाषणापूर्वी समता सैनिक दलाने आंबेडकर यांना सलामी दिली. सभेचे सूत्रसंचलन प्रा.कृष्णा पाटील इंगळे यांनी केले तर आभार प्रा. आबाराव वाघ यांनी मानले.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!