ChikhaliVidharbha

एमआयडीसीत शेतकर्‍यांची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही!

- आ. श्वेताताई महाले यांची भालगाव, बेराळा आणि भानखेडच्या शेतकर्‍यांना ग्वाही!

– जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला स्थगिती मिळविण्यात यश; शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची दिली ग्वाही

चिखली (तालुका प्रतिनिधी) – काळ्या आईची मशागत करून मोत्याचे दाणे पिकवणारा आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याची लेक म्हणून मी विधानसभेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पाच वर्षांपूर्वी पोहोचले. या कार्यकाळात सदैव शेतकरी हिताचा विचार मी केला. माझ्या हातून कधीही शेतकरीविरोधी कार्य आजवर झाले नाही, आणि भविष्यातही होणार नाही, त्यामुळे विरोधकांकडून पसरवल्या जाणार्‍या अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नका; तुमची एक इंच जमीनसुद्धा एमआयडीसीसाठी अधिग्रहित केली जाणार नाही, याची शंभर टक्के ग्वाही मी देते, अशा स्पष्ट शब्दात आ. श्वेताताई महाले यांनी भालगाव, बेराळा आणि भानखेड येथील शेतकर्‍यांना आश्वासित केले. आपल्या जनआशीर्वाद दौर्‍यादरम्यान स्थानिक कास्तकारांशी संवाद साधताना श्वेताताई महाले बोलत होत्या.

भाजपा महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात जनआशीर्वाद दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौर्‍यादरम्यान आ. श्वेताताई महाले यांनी विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी भालगाव येथे स्थानिक गावकरी व शेतकर्‍यांशी संवाद साधताना येथील शेतकर्‍यांकडून एमआयडीसीच्या जमीन अधिग्रहणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ. श्वेताताई महाले यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण केले. चिखली एमआयडीसीच्या विस्तारीकरणाबाबत आता पूर्ण चित्र स्पष्ट झाला आहे. राज्य शासनाकडून एमआयडीसीला लागून असलेल्या भालगाव, बेराळा, भानखेड आदी गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सहा महिन्यापूर्वी सुरू झाली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीदेखील व्यक्त झाली होती. शेतकर्‍यांची ही जनभावना लक्षात घेऊन मी राज्य शासनापर्यंत ती पोहोचवली आणि या जमीन अधिग्रहणाला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या प्रयत्नांना यश आल्यामुळेच महाराष्ट्र सरकारने भालगाव, बेराळा भानखेड या गावांसह परिसरातील शेतजमिनी अधिग्रहित करण्याचा आपला निर्णय मागे घेतला असून, तहसीलदार व तलाठी यांनादेखील त्याबाबत कळवण्यात आले आहे. कोणाचीही जमीन आता एमआयडीसीच्या विस्तारीकरणात जाणार नाही, याची प्रत्येक शेतकर्‍याने खात्री बाळगावी व विरोधी पक्षांकडून केल्या जाणार्‍या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन यावेळी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!