तुम्ही आमदार करा, मी मतदारसंघाचा कायापालट करते!
- वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांचे आश्वासन
– मेहकर-लोणार मतदारसंघाच्या विकासाचा मांडला रोडमॅप!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार व शेतकरी नेत्या डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी तुम्ही मला आमदार करा, मी या मतदारसंघाचा कायापालट करून दाखवते, अशी साद मतदारांना घातली आहे. यावेळी त्यांनी या मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅपच मांडला. विविध गावभेट दौर्यादरम्यान त्या मतदारांशी संवाद साधत असून, त्यांना जोरदार प्रतिसाद लाभत आहे. अनेक मायमाऊल्या तर त्यांच्या तोंडावरून हात फिरवत आपले आशीर्वाद त्यांना देत आहेत.
आमदार झाल्यानंतर शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य असून, सिंचन व्यवस्था निर्माण करणे, पीकविमा व नुकसानभरपाईसाठी विधानसभेत आवाज उठविणे, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवणे, आरोग्य सुविधा दर्जेदार व लोकाभिमुख करणे, मेहकरात एमआयडीसी आणून रोजगार व उद्योगाच्या संधी निर्माण करणे, सरकारी शाळांचा दर्जा सुधारून गोरगरिबांच्या लेकरांनाही चांगले शिक्षण मिळवून देणे, आदी कामे आपण प्राधान्याने करू, असे गावभेट दौर्यांदरम्यान डॉ. ऋतुजा चव्हाण हे लोकांना आश्वासन देत आहेत. आपली लेक व बहीण म्हणून एकदा संधी द्या, असे आवाहनही त्यांनी मायबाप जनतेला केलेले आहे.
मेहकर-लोणार या विधानसभा मतदारसंघात विकासाची मोठी तूट निर्माण झाली आहे. जेथे महिला नेतृत्व असते, तेथे विकासकामे काळजीपूर्वक होतात. शेजारच्या चिखली मतदारसंघात एमआयडीसी, पाणी, रस्ते आदींचा विकास होऊ शकला. परंतु, मेहकर व लोणार तालुके मात्र विकासापासून वंचित राहिलेत. त्यामुळे शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मला एकवेळ संधी द्या, अशी विनंती डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी ग्रामस्थ, महिला व तरूणवर्गाकडे केली आहे. मतदारसंघात रस्ते नीट नाहीत, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. हिवरा आश्रमसह अनेक ठिकाणी सरकारी रूग्णालये बांधले पण तेथे आरोग्य सेवाच नीट सुरू झालेली नाही. मेहकर येथील सरकारी दवाखान्याची अवस्था तर सर्वश्रुतच आहे. सिंचनासाठी पाणी नाही, अगदी धरण उशाला अन कोरड घशाला अशी या मतदारसंघाची दयनीय परिस्थिती आहे. एकीकडे मोठे पूर येऊन पाणी वाहून जाते, आणि दुसरीकडे अनेक गावांत पाण्याचे मोठे दूर्भिक्ष्य दरवर्षी निर्माण होते. शेतकर्यांना पीक नुकसान भरपाई मिळत नाही. सोयाबीन व कपाशीला भाव नसताना एकही लोकप्रतिनिधी याप्रश्नी तोंड उघडायला तयार नाही. पीकविम्याची रक्कमही मिळाली नाही. तरूणांच्या हाताला रोजगार नाही. मेहकर येथे एमआयडीसी आणता आली नाही, म्हणून स्थानिक तरूणांना उद्योजक होता आले नाही, की त्यांना रोजगार मिळाला नाही. नोकरी-धंद्यासाठी तरूण व तरूणींना आपले गाव सोडून छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई यासारख्या शहरांत जावे लागते आहे. दर्जेदार शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षणासाठी बुलढाणा, अकोला किंवा छत्रपती संभाजीनगरला जावे लागते आहे. या मतदारसंघात गेल्या तीस वर्षांत काहीच विकास होऊ शकला नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. ही शोकांतिका दूर करायची असेल व मतदारसंघात विकासाची गंगा वाहू द्यायची असेल, तर एकवेळ मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, अशी विनवणीही डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी मतदारांकडे केली आहे.