ऋषांक चव्हाणांनी दिलेल्या बंदुकीतून रविकांत तुपकर कुणावर निशाणा साधणार?
- मेहकरात तुपकर हे डॉ. चव्हाणांच्या माध्यमातून आ. रायमुलकरांची शिकार करणार, की सिद्धार्थ खरातांची?
– डॉ. ऋतुजा चव्हाण यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी; पण प्रचाराची धुरा रविकांत तुपकरांच्या खांद्यावर!
मेहकर (विशेष प्रतिनिधी) – शेतकरी संघटना – क्रांतीकारीचे संस्थापक तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणजे शेतकर्यांची मुलुखमैदानी तोफ. तुपकरांनी आज डोणगाव येथील डोणगाव अर्बन को.-ऑपरेटीव्ह बँकेला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी डोणगाव अर्बनच्या नूतन वास्तूची पाहणी केली. यावेळी शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांनी तुपकरांना दोन बोरच्या बंदुकीची फोटोफ्रेम त्यांना सप्रेम भेट केली. तुपकरांना बंदुकीची फ्रेम देताना ऋषांक चव्हाण यांच्या या बंदुकीतून अनेक राजकीय मेसेज गोळीसारखे सुटले आहेत. तुपकर मेहकर मतदारसंघात कुणाची शिकार करणार? हेदेखील त्यातून अधोरेखीत झाले आहे. बंदूक चव्हाणांची; शिकार करणारे तुपकर; आणि शिकार रायमूलकर की सिद्धार्थ खरात? याबाबत मात्र आता चर्चेला उधाण आले आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे डोणगाव अर्बन बँकेत आले होते. तेथे त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांच्याशी गुप्तगू केल्याची माहिती हाती आली आहे. यावेळी तुपकरांसोबत शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक यांच्यासह जावेद खान, राजू कुसळकर, राम अंभोरे, गजानन टोंचर आदींचीही उपस्थिती होती. सहकारक्षेत्रातील दिग्गज नाव असलेले ऋषांक चव्हाण यांच्या पत्नी व शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण या वंचित बहुजन आघाडीकडून मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. चव्हाण दाम्पत्य हे शेतकरी चळवळीत सक्रीय असून, तुपकरांचे निकटवर्तीय आहेत. डॉ. ऋतुजा चव्हाण या वंचित आघाडीच्या उमेदवार असल्या तरी, त्यांच्या प्रचाराची सर्व धुरा हे तुपकरांचे सहकारी डॉ. ज्ञानेश्वर टाले हे सांभाळत आहेत. तर तुपकरांनीदेखील डॉ. ऋतुजा चव्हाण यांना पाठिंबा देत, त्यांच्या विजयाची व्यूहरचना आखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ऋषांक चव्हाण यांनी तुपकरांच्या हाती दिलेल्या बंदुकीचा रोख नेमका कुणाकडे? ते आमदार संजय रायमुलकर यांची शिकार करणार की सिद्धार्थ खरात? याबाबत आता मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.
ठाकरे गटाचे उमेदवार व माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात हे तुपकरांचे जवळचे स्नेही आहेत. गेल्या अनेक दशकांपासूनची ही मैत्री आहे. तर मेहकर व लोणार तालुक्यात तुपकरांची शेतकरी चळवळ जोरात असून, त्याची चुणूक लोकसभा निवडणुकीत विरोधकांना दिसून आलीच आहे. विधानसभा निवडणुकीत तुपकरांनी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, परंतु त्यांच्या सहकार्यांनी सहाही मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे तुपकरांची भूमिका ही चार नोव्हेंबरनंतरच समोर येण्याची शक्यता आहे. मेहकरात मात्र त्यांनी डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले असून, तुपकरांची सर्व यंत्रणा व शेतकरी चळवळ डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारात सक्रीय झालेली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार संजय रायमुलकर व ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात या दोघांच्याही राजकीय अस्तित्वाला सुरूंग लागला आहे. आता ऋषांक चव्हाण यांच्याकडून मिळालेल्या बंदुकीने रविकांत तुपकर मेहकरात नेमकी कुणाची शिकार करणार? याबाबत खमंग राजकीय चर्चा मेहकर व लोणार तालुक्यांसह जिल्ह्यात सुरू झालेली आहे.
————–