Breaking newsBULDHANAHead linesSINDKHEDRAJAVidharbha

सिंदखेडराजानजीक समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार!

- मृतकांमध्ये आई-वडिलांसह मुलाचा समावेश; चालकासह मुलगी गंभीर जखमी

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – समृ्द्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३३४.६०० जवळ पुणे येथून अमरावतीकडे जाणार्‍या एमएच १७ एजे ९१७३ क्रमांकाच्या इंडिगो कारने ट्रक (क्रमांक एम एच २१ बी एच ५९७६) ला मागून उजव्या बाजूने भरवेगात धडक दिली. या भीषण अपघातात तिघे जण ठार तर चालकासह दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. मृतक एकाच कुटुंबातील असून, त्यामध्ये आईवडील आणि मुलाचा समावेश आहे. त्यांची मुलगी आणि चालक जखमी झाले असून, त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आज (दि.३१) सकाळी हा भीषण अपघात घडला. इंडिगो कार फार वेगात असल्याने चालकाकडून अनियंत्रीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिने समोरून जाणार्‍या माल वाहक ट्रकला जोरदार धडक दिली.

या अपघातानंतर पोलीस उपनिरीक्षक पवार आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढले. जखमींवर प्राथमिक उपचार करून सिंदखेडराजा येथे उपचारासाठी हलविले. अपघातामुळे नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहनाला ‘बॅरिगेटिंग’ करण्यात आले नंतर समृद्धीवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या भीषण अपघातात कारमधील प्रवाशी शुभांगी दाभाडे वय ३२ वर्ष, राजेश दाभाडे वय ४२ वर्ष हे जागीच मयत झाले. तसेच कारमधील रियांश राजेश दाभाडे वय ४ वर्ष याला रुग्णवाहिकेद्वारे उपचारसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. याशिवाय, समीक्षा राजेश दाभाडे आणि वाहनचालक आश्विन धनवरकर हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णवाहिकामध्ये औषधोपचार करण्यात आला आहे. ट्रकचालक खाजा शेख (राहणार जालना) याला सिंदखेडराजा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपघातस्थळी दुसरबीड येथील १०८ रूग्णवाहिका तातडीने पोहोचली होती. या रुग्णवाहिकेमधील डॉ. अक्षय विघ्ने, डॉ. वैभव बोराडे, चालक शैलेश दळी, दिगांबर शिंदे यांनी जखमीवर उपचार केले. तसेच सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात हलवले. यावेळी बचाव कार्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार राठोड, पोलीस जमादार किरके तसेच नाईक, पाटील, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. वैभव बोराडे व चालक शिंदे आदी सिदखेडराजा व दुसरबीड चमूतील कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!