चिखलीत पोलिस बंदोबस्त वार्यावर; ऐन सणासुदीत वाहतूक कोंडी!
- रूग्णवाहिका जाण्यासाठीही करावी लागली तारेवरची कसरत!
चिखली (महेंद्र हिवाळे) – दिवाळी सारखा महत्वाचा सण आलेला आहे, त्यात विधानभा निवडणुकाही सुरू आहेत. अशा परिस्थितीत चिखली शहरात पोलिसांच्या बंदोबस्ताचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे. तुफान गर्दी असून, चौकाचौकात वाहतूक तुंबली जात आहे. आज तर रूग्णवाहिकेला जाण्यासाठीदेखील रस्ता मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त लावावा, अन्यथा काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.
चिखली हे तालुक्याचे ठिकाण व महत्वाची बाजारपेठ असल्याने येथे दिवाळी खरेदीसाठी ग्रामस्थ व नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. त्यामुळे चौकाचौकात तुफान गर्दी झालेली आहे. परंतु, या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेण्यासाठी एकाही चौकात पोलिस बंदोबस्त दिसून आला नाही. आज सकाळी चिखली बसस्थानकासमोर तर एक रूग्णवाहिका चांगलीच अडकून पडली होती. बसस्थानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, विवेकानंद चौक यासह सर्वच चौकात सद्या वाहतूककोंडी होत असून, गर्दीचे नियंत्रण करण्यात पोलिस यंत्रणा निष्क्रिय दिसून येत आहे. या गर्दीचा काही समाजकंटक गैरफायदा घेण्याची शक्यता पाहाता, पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढविण्याची मागणी पुढे आली आहे.
—————