अॅड. प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली; पुण्यातील खासगी रूग्णालयात दाखल!
- हृदयात रक्ताची गुठळी, आज अॅन्जोप्लास्टी होणार; कार्यकर्ते, उमेदवार चिंतेत!
पुणे (विशेष प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आज (दि.३१) पहाटे पुण्यातील एका खासगी रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अॅन्जोप्लॅस्टी शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया सुरू होती. हृदयात रक्ताची गुठळी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगरानीखाली आहेत, व सद्या प्रकृती स्थीर व बरी आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ट्वीटर अकाउंटवरून देण्यात आलेली आहे. पुढील तीन ते चार दिवस अॅड. आंबेडकर हे रूग्णालयातच राहणार असल्याने त्यांचे कार्यकर्ते काळजीत पडले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकर यांची तब्येत बिघडल्याने उमेदवारही चांगलेच काळजीत पडल्याचे दिसून येत आहे.
पक्षातील प्रवत्तäयांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थीर आहे. त्यांच्या हृदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस ते रूग्णालयात असतील. प्रकाश आंबेडकर यांना कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांमध्ये आदराने बाळासाहेब असेही संबोधले जाते. ‘बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरूवार, ३१ ऑक्टोबररोजी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’ अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने ‘एक्स’ या सोशल मीडियावरील अकाऊण्टद्वारे दिली आहे. पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत, असेही कळवण्यात आलेले आहे.
————