राजकारणाचा ‘चिखल’; मित्र पक्षाला जागा गेल्याची ‘सल’!
- सिंदखेडराजा, चिखली व बुलढाण्यात 'महायुती'त खटके; खामगावातही पेच!
– महाविकास आघाडीतील खदखदही चव्हाट्यावर!
– जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. वासनिक जिल्ह्यात अन् शिलेदाराचे मेहकरात बंड!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीत झालेल्या वाटाघाटीत मित्र पक्षांना जागा गेल्याची ‘सल’ अनेकांना ‘सलत’ असल्याचे दिसून येत आहे. सिंदखेडराजा, चिखली व बुलढाणा मतदारसंघात महायुतीत खटके उडालेले असून, खामगावही काहीसा असाच पेच निर्माण झाल्याचे दिसते. तर, महाविकास आघाडीतही खदखद उफाळून आल्याचे दिसत असून, जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.मुकूल वासनिक काल, दि. २९ ऑक्टोबररोजी जिल्हा दौर्यावर असतानादेखील त्यांच्याच एका शिलेदाराने मेहकरात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचा झेंडा फडकाविला. मलकापुरातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे एकंदरित चित्र पाहता, राजकारणाचा सध्यातरी ‘चिखल’ झाल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची काल, दि. २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. त्यामुळे काल इच्छुकांची चांगलीच दमछाक दिसून आली. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटप होऊनही मित्रपक्षांना जागा गेल्याने काहींचा तीळपापड झाला, त्यामुळे अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने पेच निर्माण झाला आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ महायुतीत तसा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जातो. परंतु हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडल्याचे सांगण्यात येत असून, येथून डॉ. शशिकांत खेडेकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, असे असताना युवक काँग्रेसचे मनोज कायंदे यांनाही ऐनवेळी राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाय, येथून भाजपचे सुनील कायंदे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात आ.श्वेताताई महाले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असताना, बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांची येथून उमेदवारी दाखल केली आहे. तसेच रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनीही अर्ज भरला आहे. बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली असताना येथून तीनदा शिवसेनेवर आमदार राहिलेले व सध्या भाजपात असलेले विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली आहे. विजयराज शिंदे यांनी बुलढाण्यातून उमेदवारी दाखल केल्यामुळे आ.संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाची उमेदवारी चिखलीतून भरून भाजपवर चांगलाच दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. यामध्ये आ. संजय गायकवाड व विजयराज शिंदे यांचे वैर सर्वश्रुत आहे, असे असताना कुणाल गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे आ.श्वेताताई महाले यांना नाहक फटका बसू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. तर श्वेताताईंच्या आडून हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकण्याच्या राजकारणाचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी महाविकास आघाडीत कोणतीही बंडखोरी होणार नाही, अशी सक्त ताकीद देत बंडखोरांची ‘हवाच’ काढून घेतली आहे, असे असताना उमेदवारी मागे घेतली तरीही ‘हौदोसे गई, ओ बुंदोसे नही आती’ असे कार्यकर्ते बोलत आहेत.
खामगावात बजरंग दलाचे अमोल अंधारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने भाजपाचे आ.आकाश फुंडकर यांनाही राजकीय पेच निर्माण झाला आहे. महायुतीत अशा खटक्यांचा आवाज घुमत असताना, महाविकास आघाडीलाही याची लागण झाल्याचे दिसून येत आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वाट्याला गेल्याने येथून उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयीन माजी प्रशासकीय अधिकारी सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माझ्यावर कसा अन्याय झाला, याची जंत्री वाचत काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांनी येथून काल, दि. २९ ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी माजी सभापती नंदकिशोर बोरे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव देशमुख, ज्येष्ठ नेते नाजिम कुरेशी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, माजी जि.प. अध्यक्ष भास्कर ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, त्याच दिवशी जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.मुकूल वासनिकदेखील जिल्हा दौर्यावर होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण उमेदवारी दाखल केल्याचे घुबरे हे सांगतात. तसे पाहता लक्ष्मण घुमरे यांना २०१४ मध्ये काँग्रेसकडून मेहकर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. शिवाय, ते जिल्हा काँग्रेसचे काहीकाळ प्रभारी अध्यक्षदेखील होते, तसेच इंटकचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. येथूनच शिवसेनेचे जिल्हा संघटक गोपाल बशिरे यांनीही स्वपक्षाविरुद्ध उमेदवारी दाखल केली आहे. तिकडे मलकापुरात काँग्रेसला मतदारसंघ सुटला असून, येथून राजेश एकडे हे विद्यमान आमदार असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. असे असताना येथून अॅड.हरिष रावळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. एकंदरीत ४ नोव्हेंबरला याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असले तरी यामुळे राजकारणाचा चिखल मात्र झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
‘महाविकास आघाडी’च्या उमेदवाराने मोट बांधली; ‘महायुती’चा खेळ सुरूच!