‘महाविकास आघाडी’च्या उमेदवाराने मोट बांधली; ‘महायुती’चा खेळ सुरूच!
- सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ४९ उमेदवारांनी भरले अर्ज; तर तीन अर्ज झाले बाद!
साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी ४९ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. महायुती आणि महाविकास आघाडी यात सामना होणार असे वाटले होते, परंतु, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या उमेदवारांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढत होते की काय? की एकाला थांबावे लागले हे आता ४ नोव्हेंबररोजी स्पष्ट होईल. दरम्यान, आज झालेल्या छाननीत तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून, आता ४६ उमेदवार सद्या तरी रिंगणात आहेत. यातील कितीजण आपले अर्ज मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी महायुतीतून महाविकास आघाडीत प्रवेश केला. त्यांना लागलीच उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीचा धर्म पाळत अर्ज दाखल करताना काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यामुळे घाटावरील चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ मिळाले, असा सूर बहुतेक नेत्यांनी आवळला. कारणही तसेच आहे, या चारही मतदारसंघांत डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे कार्यकर्ते आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांची उमेदवारी शेवटच्या दिवशी जाहीर झाली. त्यांचा अर्ज दाखल करताना महायुतीचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येतील, अशी अपेक्षा होती. परंतु, वेळेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांना जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी एबी फॉर्म दिल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कायंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महायुतीत काय चाललंय अशी चर्चा जनमाणसात सुरू आहे.
महायुतीचे घटक पक्ष जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत निवडणुकीची दिशा कळणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सौ. सविताताई मुंढे यांनी आपला अर्जही दाखल केला आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंकूर देशपांडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली आहे. विधानसभा निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी विजय प्रतापराव घोंगे, प्रकाश भिकाजी गिते, नामदेव दगडू राठोड, गायत्री गणेश शिंगणे, प्रशांत दिलीप पाटील, अशोक श्रीराम पडघान, सुरेश एकनाथ घुमटकर, सय्यद मुबीन सय्यद नईम, रामदास मानसिंग कहाळे, डॉ. मनोर खा रशीद खाँ पठाण, कुरेशी जुनेद रौफ शेख, अभय चव्हाण, दिलीप ब्रम्हाजी खरात, राजेंद्र मधुकर शिंगणे, दत्तात्रय दगडू काकडे (स्वतंत्र भारत पक्ष), सुनील पंतिंगराव जाधव, शेख रफीक शेख शफी, मनसब खान पठाण, दत्तु रामभाऊ चव्हाण, ज्ञानेश्वर कैलास म्हस्के, प्रल्हाद रंगनाथ सोरमारे, बाबासाहेब बन्सी म्हस्के, सुधाकर बबन काळे, भागवत देवीदास राठोड, अल्का रामप्रसाद जायभाये, शिवानंद नारायण भानुसे, अ. रफीक अ. अजीज, शिवाजी बाबुराव मुंढे, विजय पंढरीनाथ गवई, सूरज धर्मराज हनुमते यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. गायत्री गणेश शिंगणे यांनी काकाविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यांची उमेदवारी ही काकांना पाडण्यासाठी कितपत यशस्वी ठरेल, हे पाहावे लागेल. केवळ गायत्री शिंगणे ह्याच आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांना पराभूत करण्यासाठी रिंगणात उतरलेल्या नाहीत तर यातील बहुसंख्य उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांना पराभूत करण्यासाठी रिंगणात आहेत. जर महायुतीचा महाएल्गार एकत्र जमून निवडणूक लढणार नाही तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही. एवढे मात्र निश्चित.
दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी पार पडली. या छाननीत ४९ पैकी ४६ अर्ज वैध ठरले असून, तीन अर्ज बाद झाले आहेत. त्यात सुनील तोताराम कायंदे यांचा भाजपच्यावतीने दाखल अर्ज बाद ठरला असून, त्यांचा अपक्ष दाखल केलेला अर्ज मात्र वैध ठरला आहे. सुनील कायंदे हे अर्जासोबत एबी फॉर्म जोडू शकले नाहीत, म्हणून त्यांचा पक्षाच्यावतीने भरलेला अर्ज वैध ठरला. संभाजी ब्रिगेडच्यावतीने दाखल करण्यात आलेला डॉ. शिवानंद भानुसे, शिवसेनेच्यावतीने दाखल करण्यात आलेला डॉ. शशिकांत खेडेकर, मनोज कायंदे यांनी दाखल केलेला अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे दोन्ही अर्ज, आदी अर्ज वैध ठरले आहेत. तर बहुजन समाज पक्षाच्यावतीने दाखल सिद्धार्थ सिनगारे यांचा अर्ज बाद ठरला आहे. राजेंद्र मधुकर शिंगणे यांचा अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज वैध ठरला असून, त्यांना नामसाधर्म्याचा फायदा होऊ शकतो. सौ. सविताताई शिवाजी मुंढे यांचा अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दाखल असे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दाखल केलेला प्रशांत पाटील यांचा अर्ज बाद ठरला असून, ते पक्षाचा एबी फॉर्म दाखल करू शकले नाहीत. तर गायत्री शिंगणे यांचा अपक्ष अर्जदेखील वैध ठरला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दाखल केलेले चारही अर्ज वैध ठरले आहेत.
———–