ChikhaliHead linesVidharbha

चिखली तालुक्याला पावसाने झोडपले; सोयाबीन पिकाची अतोनात नासाडी!

- मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ परिसराला मोठा फटका!

– शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला; तातडीने नुकसान भरपाईची मागणी

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यासह सिंदखेडराजा, मेहकर, लोणार व मेहकर तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस सुरू असून, या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनची अतोनात नासाडी झाली आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने या पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. चिखली तालुक्यातील मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, शेळगाव आटोळ, इसरूळ, अमोना, अंत्री कोळी शिवार, मेरा परिसरात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन तर हातचे गेलेच, पण तुरीसह इतर पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी पुरता खचून गेला आहे.

हवामान विभागाने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाने झोडपण्यास सुरूवात केली आहे. काल रात्रीपासूनच्या जोरदार पावसाने रोहणा नदीला पूर आला असून, बुलढाणा-नागपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यातील खामगाव, बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार या तालुक्यांत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाने या तालुक्यांतील शेतीपिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनची नासाडी झाली असून, सोयाबीन हे पीक पुरते हातातून गेले आहे. आधीच संकटात सापडलेले हे पीक थोडेफार हाती येण्याची शेतकर्‍यांना आशा होती; परंतु या पावसाने आतादेखील हातातून गेले आहे.


  • दरम्यान, विदर्भ व मध्य भारतात सध्या सुरू असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नाही, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. विदर्भातून ५ ते १० सप्टेंबरदरम्यान मान्सून निघण्याची व या काळात मध्यम पाऊस होण्याचीही शक्यता आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून देशातून निघून जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे हा परतीचा पाऊस नसून, मोसमी पाऊसच आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. या मुसळधार व संततधार पावसामुळे सोयाबीन, तूर व काही ठिकाणी हळद पिकाला मोठा फटका बसला असून, या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून गेला. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांतून केली जात आहे.
    ————-
  • – धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या अशा लोहरा तालुक्यातल्या माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकलपाचे चार वक्र दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून १ हजार ५२० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग तेरणा नदीपात्रात सुरु आहे.
  • – पुणे शहर आणि धरण क्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी पानशेत, वरसगाव, टेमघरे तसंच पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न पवना ही धरण शंभर टक्के भरली आहेत, तर खडकवासला धरण ९० टक्के भरलं आहे. त्यामुळे पुणे शहर, तसंच पिंपरी चिंचवड परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
  • – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही ९९ टक्क्यांहून अधिक भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून १८ दरवाजातून एकूण ९ हजार ४३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!