आंदोलन पेटले; कोल्हापुरात शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न!
- तब्बल ३०० शिक्षक-शिक्षिकांना ताब्यात घेऊन नंतर पोलिसांकडून सुटका
– शासन आमच्या मरणाची वाट पहाते का?: संतप्त शिक्षकांचा सवाल
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने वाढीव टप्प्याच्या विषयाला बगल दिल्याने विनाअनुदानीत शिक्षकांनी आज सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस व शिक्षकांमध्ये चांगलीच ताणाताणी झाली. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर या आंदोलनाने चांगलाच तणाव निर्माण झाला होता. वाढीव टप्प्याच्या जीआरसह शिक्षकांच्या इतर मागण्यांसाठी गेल्या ५६ दिवसांपासून शिक्षक तीव्र आंदोलन करत असून, मुंबईतील आझाद मैदानासह विविध जिल्ह्यांतदेखील आंदोलने सुरू आहेत. तरीदेखील राज्यातील गेंड्याची कातडी पांघारलेले सरकार शिक्षकांच्या भावनांची दखल घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
आंदोलनाच्या ५६ व्या दिवशी आज कोल्हापूर विभागातील आंदोलन तीव्र स्वरूपाचे झाले. उपसंचालक कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते, उपस्थित हजारो शिक्षकांची आणि पोलीस यांच्यात झटापट झाली, आणि शेकडो शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आपल्या रास्त न्याय मागणीसाठी गेले दोन महिने रस्त्यावर बसलेल्या शिक्षकांचा संयम सुटला आणि अखेर मरणाच्या तयारीत असताना पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अनेक कल्याणकारी घोषणा केल्या. सर्वांना निधी दिला, सगळ्या बाबतीत सक्रिय असणारे सरकार आमचा फक्त शासन निर्णय काढण्यास इतके उदासीन का? एका दिवसात अनेक शासन निर्णय काढणारे सरकार आमच्या शिक्षकांचा एक शासननिर्णय काढण्यास इतका वेळकाढूपणा का करत आहेत? असा संतप्त सवाल यावेळी शिक्षकांनी केला.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे खंडेराव जगदाळे सर आणि तब्बल ३०० शिक्षकांना पोलिसांनी दमदाटी करून आत्मदहनापूर्वीच ताब्यात घेतले, आणि जवळपास ३ तास पोलीस स्टेशनमध्ये ठेवून योग्य ती कार्यवाही करून सोडून दिले होते. आंदोलन झाल्यानंतर पायाला भिंगरी बांधून पुन्हा जगदाळे सर आणि शिष्टमंडळाने भैय्याबाबा माने यांची भेट घेऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन केला. यावेळी जगदाळे सर आणि मुश्रीफ यांची फोनवर चर्चा झाली. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर या विषयावर चर्चा झाली आहे, येणार्या बैठकीत निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. तर काहीही झालं तरी माघार नाहीच, लवकर निर्णय न घेतल्यास याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करणार, असल्याचा इशारा यावेळी जगदाळे सर व आंदोलकांनी राज्य सरकारला दिला आहे.राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्षकांना निव्वळ वेड्यात काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. सभागृहात २ जुलैला वाढीव टप्प्याची घोषणा झाली. अद्यापही त्याचा जीआर निघालेला नाही. वेळकाढूपणा आणि वारंवार होणार्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताही विषय न घेतल्याने शिक्षकांची फसवणूक झाल्याची भावना तब्बल ६० हजार शिक्षकांत आहेत. यापूर्वी १८ सप्टेंबरला कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र ती झाली नाही, त्यानंतर १९ तारखेचीही कॅबिनेट रद्द झाली. सोमवारी तर या विषयावर काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे विनाअनुदानीत शिक्षक चांगलेच संतप्त झाले असून, या सरकारला निवडणुकीत धडा शिकविण्याचा इशारा विनाअनुदानीत शिक्षकांनी दिलेला आहे.
—————–