चिखली (तालुका प्रतिनिधी) – विषारी मन्यार जातीचा साप चावून पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील ईसरूळ येथे परवा रात्री घडली आहे. उपचाराला उशीर झाल्याने या बालकाचा बळी गेल्याची चर्चा आहे. या घटनेने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर असे, की ईसरूळ येथील शेख मेहबुब शेख गफुर या आपल्या पाचवर्षीय अल्तमास या बालकासह घरामध्ये खाली अंथरूण टाकून गोधडीवर झोपले होते. परवा रात्री (दि.२४) साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांना मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी उठून पाहिले असता त्यांना साप दिसला. त्यांनी मुलाकडे साप चावल्याबाबत विचारले, तसेच पाहणीही केली. पण, त्यांना साप कुठे चावल्याचे दिसून आले नाही. काहीवेळाने मुलाला त्रास सुरू झाला, त्यामुळे या सापाला मारून त्यांनी मुलाला उपचारासाठी चिखली येथील डॉ. दळवी यांच्या हॉस्पिटलमध्ये, नंतर डॉ. धनवे यांच्याकडे व नंतर योगीराज हॉस्पिटल येथे हलविले. मन्यार जातीचा साप खूपच विषारी असून, नजीकचे शेळगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रात्रीच्यावेळी बंद असल्याने या मुलाला वेळीच उपचार मिळू शकले नाही. उपचाराला उशीर झाल्याने अखेर पाचवर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने ईसरूळ गावासह परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सद्या या भागात जोरदार पाऊस सुरू असून, साप बाहेर आल्याने सर्पदंशाचे धोके वाढले आहेत.