बुलडाणा/पळसखेड नागो (संजय निकाळजे) – देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालुन भारत मातेच्या सुरक्षेसाठी आपली सेवा देणारे वीर जवान दीपक बनसोडे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर बुधवार, २५ सप्टेंबर रोजी त्यांच्या मूळगावी पळसखेड नागो येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान दीपक यांचे पार्थिव पळसखेड नागो येथे आणल्यानंतर गावातील रस्त्याच्या दुतर्फा ह्या फुलांच्या रांगोळ्याने सज्ज झाल्याचे दिसत होत्या, यावेळी ‘अमर रहे.. अमर रहे.. वंदे मातरम.. भारत माता की जय’ या घोषात यांची मिरवणूक काढण्यात आली.आपल्या गावचा सुपुत्र दीपक बनसोडे यांना वीरमरण आल्यानंतर गेल्या दोन दिवसात पळसखेड नागो शोकसागरात बुडाले होते. पंचक्रोशीतील जनता गहिवरल्याचे दिसून आले.
जम्मू कश्मीर मधील कोपवाडा भागात कर्तव्यावर असताना दीपक बनसोडे यांना २२ सप्टेंबरला वीर मरण आले. त्यानंतर २४ सप्टेंबरला रात्री मुंबईवरून दीपक यांचे पार्थिव बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उशिरा आणण्यात आले. बुधवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सजवलेल्या गाडीतून जवान दीपक बनसोडे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.बिरसिंगपूर, देऊळघाट, दहिद फाट्यावर वीर जवान दिपक यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर १२ वाजी दरम्यान पार्थिव बनसोडे कुटुंबियांच्या घरी आणण्यात आले. यावेळी वीर पत्नी, वीर माता – पिता यांचा आक्रोशाने उपस्थितांची मन हेलावून गेले. दिपक बनसोडे यांचे पार्थिव नियोजित अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आणल्यानंतर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर सैन्यदलाच्या वतीने हवेत तीन फैरी तर बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हवेत ५ फैरी झाडण्यात आल्या. त्रिशरण, पंचशील झाल्यानंतर दिपक बनसोडे यांच्या मोठ्या भावाने पार्थिवाला अग्नी दिला.
सैन्य दलात पती आणि वीर पत्नी अश्विनी स्वतः मुंबई पोलीस दलात कार्यरत असून दोघेही देश सेवेसाठी आपले योगदान देत होते. गरिबीचे चटके सहन करता करता आता कुठे चांगले दिवस या कुटुंबाला आले होते. जम्मू कश्मीर भागात दीपक कर्तव्यावर होते. आपल्या पतीचे तिरंग्यात सामावलेले पार्थिव पाहिल्यानंतर अश्विनी यांचा आकोश काळीज चिरणारा होता. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, जयश्रीताई शेळके, संजय राठोड, संदीप शेळके, कुणाल गायकवाड, शर्वरी तुपकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील महिला- पुरुष, युवक वर्ग यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली.