गावठाण प्रमाणपत्र, मालकीहक्क प्रमाणपत्र देण्यास ग्रामपंचायत अधिकार्यांचा विरोध!
- दुय्यम निबंधकांना दिले लेखी पत्र; शासनाने मनाई केली असतानाही ग्रामस्थांना वेठीस धरून मागितली जातात प्रमाणपत्रे!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – जागेची खरेदी किंवा विक्री करताना दुय्यम निबंधक कार्यालयाकडून (रजिष्टार ऑफिस) गावठाण प्रमाणपत्र, चतुःसीमा प्रमाणपत्र, मालकी हक्काचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मागितली जातात. वास्तविक पाहाता, ही प्रमाणपत्रे मागण्यास शासनाने बंदी घातली आहे. तर ही प्रमाणपत्रे देताना ग्रामसेवकांचे ग्रामस्थांशी नाहक वाद होतात. तेव्हा, शासन आदेश नसल्याने आम्ही ही प्रमाणपत्रे देणार नाहीत, अशा स्वरूपाचे लेखी निवेदन ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने दुय्यम निबंधकांना दिले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने, आज, दि. ८ ऑक्टोंबररोजी दुय्यम निबंधक कार्यालय सिंदखेडराजा, यांना पत्र देऊन जागेची खरेदी तसेच विक्री करताना, आपल्या कार्यालयाकडून गावठाण प्रमाणपत्र, चतुःसीमा प्रमाणपत्र, मालकी हक्काचे प्रमाणपत्र, मागितल्या जाते. ग्रामपंचायत कार्यालयाकडून गाव नमुना आठ, नक्कल दिल्यानंतर कोणतेही कारण नसताना वरील प्रमाणपत्र मागतात. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक नागरिकांशी वाद होतात, शासनाच्या नियमानुसार हे प्रमाणपत्र देणे बंद आहे, त्यामुळे आपण अशा प्रमाणपत्राची मागणी करू नये, जागेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी, गाव नमुना आठची नक्कल पुरेशी आहे, तरीसुद्धा आपण वरील प्रमाणपत्र मागत असल्यामुळे, ग्रामीण भागात काम करत असताना, ग्रामपंचायत अधिकारी अडचणीत येतात, शासनाच्या नियमानुसार, ग्रामपंचायत कडून हे प्रमाणपत्र देण्यात यावे, असा कुठेही उल्लेख नाही, तरीसुद्धा आपले कार्यालय आडेल भूमिका घेऊन, नागरिकांना हे प्रमाणपत्र आणण्यास भाग पाडतात, तरी आपणास या निवेदनाद्वारे, अशी विनंती करण्यात येते की, वरील प्रमाणपत्राची मागणी न करता, जागेची खरेदी किंवा विक्री करून द्यावी, या निवेदनावर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष कैलास झिने, गणेश मेहत्रे, उद्धव गायकवाड, विनोद सातपुते, दीपक मेहत्रे, अरविंद राठोड, शरद वाघ, बोडखे, यांच्या सह्या आहेत.