सिंदखेडराजात पुन्हा एकदा रंगणार कायंदेविरूद्ध शिंगणे लढत!
- शरद पवारांनी सिंदखेडराजात निर्णायक डाव टाकलाच; माजी आ. तोताराम कायंदेंना भेटीसाठी बोलावले!
– सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी सात जणांनी दिल्या शरद पवारांकडे मुलाखती
– कु. गायत्रीला पुढे करून पवारांनी खेळला कायंदेंचा पत्ता!
साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – ज्येष्ठ नेते शरद पवार हे राजकारणातील मातब्बरच नाही तर प्रत्येक मतदारसंघातील खडानखडा माहिती असलेले अफाट नेतृत्व आहे. राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी ते प्रत्येक मतदारसंघात नियोजनपूर्वक आणि राजकीय मुरब्बीपणे उमेदवार देत आहेत. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पराभूत करण्यासाठी अखेर पवारांनी निर्णायक खेळी खेळली असून, माजी आमदार तथा भाजपचे नेते, तथा जुने सहकारी तोताराम कायंदे यांना भेटीसाठी बोलावणे धाडले आहे. त्यादृष्टीने सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कायंदे-शिंगणे अशी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. कु. गायत्री शिंगणे यांना पुढे करून पवारांनी अखेर कायंदेंच्या रूपाने मजबूत पत्ता खोलल्याचे दिसत असून, राजेंद्र शिंगणे यांची चांगलीच राजकीय कोंडी केली आहे. दरम्यान, या मतदारसंघातून उमेदवारीसाठी तब्बल सात जणांनी पवारांकडे मुलाखती दिल्याची माहिती हाती आली आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल हे चित्र स्पष्ट झाले नसले तरी, महायुतीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हेच राहतील, असा निष्कर्ष काढला जात आहे. तसेच, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनीदेखील डॉ. शिंगणे हे महायुतीचेच उमेदवार राहतील, हे स्पष्ट केलेले आहे. महाविकास आघाडीच्या बाबतीत अद्याप चित्र स्पष्ट झाले नसले तरी, दि. ६ ऑक्टोबररोजी सात इच्छूक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे पडद्यामागे खूपच वेगाने राजकीय हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. दि. ६ ऑक्टोबरला पुणे येथील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात विदर्भातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून प्रमोद घोंगे पाटील, राजेंद्र डोईफोडे, अभय चव्हाण, माजी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नरेश बोडखे, बी मन्नानखा पठाण यांनी मुलाखती दिल्या. कु. गायत्री शिंगणे यांच्यासह सात संभाव्य उमेदवारांनी पक्षाचे सहयोगी सदस्य अर्ज दाखल करून पक्षाचे सभासदत्व स्वीकारले. पक्षाकडे उमेदवारीसाठी आवश्यक ते शुल्क हे डिमांड ड्राफ्ट (डीडी)द्वारे भरले असून, त्यानंतर मुलाखतीही दिल्या आहेत. यावेळी कु. गायत्रीताई गणेश शिंगणे या अनुपस्थित होत्या. त्याच्यावतीने गौरव शिंगणे यांनी पुणे येथे जाऊन मुलाखत दिली. सात संभाव्य उमेदवारांनी मुलाखत दिल्यानंतर साखरखेर्डा तालुका मागणीचे पुरस्कर्ते वसंतराव मगर आणि एकेकाळी शरद पवारांचे कट्टर समर्थक व सहकारी राहिलेले माजी आमदार तोताराम कायंदे यांना पक्षनेतृत्वाने मुलाखतीसाठी बोलावून घेतले आहे. शरद पवारांच्या या निर्णयाने मतदारसंघात एकच खळबळ उडालेली आहे.
यातील वसंतराव मगर यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लढवून एक लाख मते मिळवली होती. या अगोदर ते शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने विधानसभेचे उमेदवारदेखील राहिलेले आहेत. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ‘म्हाडा’चे संचालक म्हणूनही काम केले आहे. आतादेखील त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला नसला तरी, त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यादृष्टीने १० ऑक्टोबर ही तारीखही चर्चेत आलेली आहे. मगर यांनी पक्ष सभासद नोंदणी अर्ज जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांच्याकडे सादर केलेला आहे. तथापि, वसंतराव मगर यांना शरद पवार हे उमेदवारी देतात, की नाही, याबाबत मात्र अनिश्चितता आहे. कारण, शरद पवार यांनी आपले जुने सहकारी तथा माजी आमदार व सद्या भारतीय जनता पक्षात प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले तोताराम कायंदे यांना भेटीसाठी बोलावणे धाडलेले आहे. जर स्वत: तुम्ही निवडणूक लढवत असाल तर पक्ष तुमचा विचार नक्की करेल. मुलगा (डॉ. सुनील कायंदे) यांच्यापेक्षा आपला जनसंपर्क मतदारसंघात चांगला आहे. प्रत्येक गावात तुमची ओळख असून, काम करण्याची हातोटी आहे. त्या अनुषंगाने आपण स्वत: तयारी करावी, असा निरोप शरद पवार यांनी तोताराम कायंदे यांना दिल्याची खात्रीशीर माहितीही प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने माजी आमदार तोताराम कायंदे यांनी मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेऊन निर्णय घेऊ, असे पवारांना कळवले असून, ते लवकरच शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याचीही माहिती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे दसर्यानंतर सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघात प्रचंड राजकीय उलथापालथी होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. तसेच, त्यामुळे पुन्हा तोताराम कायंदेंविरूद्ध डॉ.राजेंद्र शिंगणे ही लढत अनेक दशकांनंतर पहायला मिळणार आहे.
इतिहासाची पुनर्रावृत्ती की कायंदे बाजी मारतील?
महायुताrकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आ. डॉ. राजेंद्र शिंगणे हे विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत. तर महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी आमदार तोताराम कायंदे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरविण्याचे निश्चित केलेले दिसते आहे. तोताराम कायंदे यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले असून, राजेंद्र शिंगणे यांच्या राजकीय उदयानंतर त्यांना राजकीय वनवासात जावे लागले होते. परंतु, शरद पवारांनी पुन्हा एकदा कायंदे यांना सक्रीय राजकारणात उतरविण्याचे निश्चित केलेले दिसते आहे. तोताराम कायंदे हे सद्या भाजपात असून, त्यांचे चिरंजीव डॉ. सुनील कायंदे हे भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारी मागत आहेत. परंतु, ही जागा अजितदादा गटाला असल्याने तेथे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. तसेच, त्यांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ राहू, असेही सांगितल्याने ते भाजपात बंडखोरी करण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे उद्या तोताराम कायंदे व राजेंद्र शिंगणे अशी लढत झाल्यास भाजपातील एक गट खरेच शिंगणे यांचे काम करेल का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय, तोताराम कायंदे हे वंजारी समाजातील बलाढ्य नेतृत्व असून, ते मैदानात असतील तर वंजारी समाज त्यांना एकगठ्ठा मतदान करेल. शिवाय, शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असून, हा ओबीसी व मराठा वर्गदेखील तोताराम कायंदे यांनाच मतदान करेल. त्यामुळे कायंदे-शिंगणे या लढतीत, इतिहासाची पुनर्रावृत्ती होते, की कायंदे बाजी मारतील, हे तूर्त तरी सांगणे कठीण आहे.