AURANGABADBreaking newsHead linesMaharashtraMarathwada

मनधरणीचे प्रयत्न फेल; मनोज जरांगे पाटलांचे आज मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषण!

- सरकारला शेवटचं सांगतो, आमच्या मागण्या मान्य करा - जरांगे पाटलांनी ठणकावले

– खा. संदिपान भुमरेंच्या भेटीनंतरही जरांगे पाटील उपोषणावर ठाम

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज (दि.१६) मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेटदेखील घेतली. मात्र, तरीदेखील ते उपोषणावर ठाम होते. ‘आम्ही तुमच्याकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक देवेंद्र फडणवीसांनी करू नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय. आमच्या नावानं नंतर तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. मला यात राजकारण करायचं नाहीये. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये. पण आता तुम्ही निर्णय घेतला नाही, तर नंतर आमच्या नावानं आरडाओरड करायची नाही. तुम्हाला संधी म्हणून मी हे उपोषण करणार आहे’, असे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला आज सकाळी अंतरवली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून ठणकावून सांगितले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या भूमिकेनंतर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी रविवारी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघा नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली. १६ सप्टेंबरला रात्री १२ वाजेपासून जरांगे पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत. तसेच यापूर्वी जरांगे यांनी खासदार संदिपान भुमरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने संदिपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत नाराजी दूर केल्याचे समोर आले. या भेटीत दोघा नेत्यांमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला नाही. खासदार भुमरे यांनी अचानकपणे आंतरवाली सराटी गाठल्याने राजकीय वर्तुळाच चर्चा झाली होती. परंतु, जरांगे पाटील यांची भेट मी नेहमीच भेट घेतो. या आधी जेव्हा जरांगे उपोषणाला बसले होते, त्या वेळीही मी त्यांची भेट घेतली होती. समाजाच्या हितावर आमचीचर्चा झाली, असे भुमरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांना स्पष्टीकरण दिले. दरम्यान, आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणादेखील त्यांनी केली आहे. मात्र,तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रूपये दरमहा दिले म्हणजे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात गेलेले जनमत अनुकूल होईल, असा सरकारचा होरा होता. परंतु, सततच्या खासगी सर्वेक्षणातून या सरकारविरोधात रोष निदर्शनास येत आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे या सरकारविरोधात रोषात आणखीच भर पडणार आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस हे महिलांना दीड हजार रूपये वाटत असले तरी, दुसरीकडे शेतकरी, मराठा व धनगर समाज, राज्य सरकारी कर्मचारी हा राज्यातील सर्वात मोठा घटक सरकारविरोधात गेलेला आहे, असे राज्यात चित्र आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!