राजस्थानी मल्टिस्टेट बँकेतील घोटाळाप्रकरणी अभिषेक बियाणीच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या!
– चंदूलाल बियाणी, जगदिश बियाणी या मुख्य आरोपींसह अख्ख्या संचालक मंडळांवर गुन्हे दाखल!
पुणे/बीड (जिल्हा प्रतिनिधी) – राजस्थानी मल्टिस्टेट बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला आरोपी अभिषेक बियाणी याला पुण्यातून बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी अटक केली आहे. या बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी लातूर, परळी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी चंदूलाल बियाणी, त्याचा भाऊ जगदिश बियाणी याच्यासह बियाणी कुटुंबीय हे मध्यंतरी गायब झाले होते. तर या आर्थिक घोटाळ्यात बँकेचा अध्यक्ष चंदूलाल बियाणी याच्यासह अख्खे संचालक मंडळच सामील होते. यात ठेवीदारांचे जवळपास ३०० कोटी रुपये बुडवत बीडच्या परळीतील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करत, या सर्वांनी पोबारा केल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते.
संचालक मंडळातील बियाणी कुटुंबीयातील अभिषेक बियाणीला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे ताब्यात घेतले असून, मागच्या अनेक महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होता. ताब्यात घेतल्यानंतर त्याला बीडला नेण्यात आले. राजस्थानी मल्टीस्टेटच्या आर्थिक घोटाळ्यातील तपासला आता वेग येणार आहे. या बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी लातूर, परळी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. या बँकेच्या परळी शाखेत १४२ ठेवीदारांचे ७ कोटी ५३ लाख २९ हजार ९६७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या मल्टीस्टेट घोटाळयात १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण ३०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घोटाळ्यातील अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्यासह अनेक संचालक गायब असल्याने ठेवीदार आक्रमक झाले होते. या मल्टिस्टेटमध्ये गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी आंदोलन केले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
—-
राजस्थानी मल्टिस्टेट घोटाळाप्रकरणी बँकेचा अध्यक्ष चंदूलाल बियाणी, त्याचा भाऊ जगदिश बियाणी याच्यासह संचालक बालचंद्र लोढा, अभिषेक बियाणी, बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय लढ्ढा, अशोक जाजू, सतीश सारडा, प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेव रोडे, व्ही. बी. कुलकर्णी, कांबळे, तुषार गायकवाड, प्रदीप मुरकुटे, राजेश मोदानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या बँकेत अडकलेले ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.
————
गेल्याच आठवड्यात ज्ञानराधा प्रकरणी ईडी छापे
दरम्यान, राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्याप्रमाणे ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी सुरेश कुटे यास याआधीच अटक करण्यात आली असून, ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन दिवस चौकशी केल्याची समोर आली आहे. मागील आठवड्यात ईडीने ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणी विविध शाखांवर छापे टाकले होते. सुरेश कुटे याने ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते.