चिखली (महेंद्र हिवाळे) – आपल्या धडाकेबाज विकासकामांनी चिखली विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलविणार्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना वर्ष २०२३-२०२४चा उत्कृष्ट भाषणांसाठीचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर झाला आहे. कॉमनवेल्थ पार्लामेंटरी असोसिएशन, महाराष्ट्र शाखा यांच्यावतीने हा पुरस्कार त्यांना दि.३ सप्टेंबररोजी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते प्रदान केला जाणार आहे.
चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांसह राज्यातील शेतकरी, महिला, युवती, विद्यार्थी यांच्यासह कष्टकरीवर्गाचे आणि विविध विकासांचे प्रश्न मोठ्या पोटतिडकीने विधानसभेत मांडले होते. केवळ प्रश्न मांडून त्या थांबल्या नाहीत, तर त्यावर सरकारला उपायदेखील सूचवले होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांनी सभागृहाच्या कामकाजाला चालना तर मिळालीच; परंतु राज्य सरकारला त्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूकदेखील करावी लागली. त्यामुळे त्यांच्या उत्कृष्ट भाषणांची दखल घेत, कॉमनवेल्थ पार्लामेंटरी असोसिएशन, महाराष्ट्र शाखा यांच्यावतीने २०२३-२०२४ या वर्षाकरिता त्यांची उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणे या दोन्ही क्रमवारीत निवड झाली असून, दिनांक ३ सप्टेंबररोजी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते पुरस्कार वितरण केला जाणार आहे. याप्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. आ. श्वेताताई महाले या सर्वाधिक विकासकामे खेचून आणणार्या आमदारदेखील ठरल्या असून, त्यांनी आपल्या धडाकेबाज कामाची चुणूक आमदारकीच्या पहिल्याच कारकिर्दीत दाखविल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतदेखील मतदार त्यांनाच पुन्हा मोठ्या फरकाने निवडून देणार असल्याची त्यांच्या मतदारसंघातून जोरदार चर्चा आहे.