शेगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या १४ वर्षीय बालकाचे काल शेगाव येथून अपहरण झाले होते. या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून, त्याचादेखील खून करून मृतदेह पोतडीत टाकला गेला असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या बालकाचे अपहण करणारा आरोपी हा सीसीटीव्हीत वैâद झालेला होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या खुनाचा उलगडा झाला. कालच अंबाशी (ता. चिखली) येथील अपहरण झालेल्या बालकाची हत्या उघडकीस आली होती. आज आणखी एक बालकाचे खून प्रकरण उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे.
कृष्णा कराळे हा शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत होता. काल तो शिकवणीवर्गासाठी जात असताना अज्ञात आरोपीने दुचाकीवरून त्याचे अपहरण केले. याबाबत शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांसह त्याचे नातेवाईकदेखील कृष्णाचा शोध घेत होते. आज सकाळी त्याचा मृतदेह भास्तन येथील जंगल परिसरात आढळून आला. अज्ञात आरोपीने कृष्णाचे दुचाकीवरून अपहरण केल्यानंतर त्याचा खून करून मृतदेह पोतडीत घालून या जंगल परिसरात फेकून दिल्याचे दिसून आले आहे. मृतदेहाशेजारीच त्याची स्कूलबॅगही पडलेली होती. संशयित आरोपीला कालच शेगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली होती. त्याच्या चौकशीतून या खुनाचा उलगडा झाला आहे. शेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील हे पुढील तपास करत असून, लवकरच खुनाचे कारण पुढे येईल, असे त्यांनी सांगितले.
२३ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी कृष्णाला एक संशयित इसम मोटारसायकल वरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यावरून पोलिसांनी त्या संशयीताला ताब्यात घेऊन चौकशी केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या व्यक्तीची पोलिसांनी ‘कडक भाषेत’ विचारपूस केल्यावर त्याने खरे ते सांगितले. त्यानंतर या खुनाचा उलगडा झाला. शेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच दोन आरोपी ताब्यात घेतले आहे.