चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अंबाशी येथील मो. अरहान शेख हरूण या अवघ्या दहावर्षीय बालकाच्या खुनाचे कारण अखेर पोलिस तपासात पुढे आले असून, या बालकाच्या आईने म्हणजेच आरोपी शेख अन्सार शेख नासीर (वय ३०) याच्या मामीने अन्सारच्या बहिणीची सोयरीक मोडल्याच्या रागातून त्याने हे नृशंस कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. बहिणीची सोयरीक मोडल्यामुळे अन्सार हा मामीवर दात खावून होता. त्याच्या रागातून त्याने दहावर्षीय बालकाची अतिशय थंड डोक्याने नृशंस हत्या केली. आरोपी हा सद्या पोलिस कोठडीत असून, चिखली पोलिस त्याच्याविरोधात भरभक्कम पुरावे गोळा करत आहेत.
अंबाशी येथील शेख हारुण शेख गणी (वय ३५) यांचा मुलगा मो. अरहान शेख हरूण हा दि. २२ जुलैला सकाळी ९ वाजता बाहेर खेळण्यासाठी गेला असता, परत आला नाही. दरम्यान, चिखली पोलिसांनी सदर प्रकरणी तात्काळ फिर्यादीच्या अहवालावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. ठाणेदार संग्राम पाटील यांच्यासह पथकांनी अपहरण झालेल्या बालकाचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी अंबाशी व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असता, बालकास आरोपी शेख अन्सार शेख नाशीर (वय ३०) वर्षे रा. अंबाशी याच्यासोबत जाताना पाहिल्याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून माहिती मिळाली. सदर माहितीवरून पोलिसांनी संशयित शेख अन्सार यास ताब्यात घेतले. त्याने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच, त्याने पंचासमक्ष मो. अरहान शेख हरूण या बालकाचे अपहरण करुन त्याचा गळा आवळून खून केला असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर बालकाचे प्रेत पोत्यात टाकून घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या उकिरडयात पुरुन ठेवल्याबाबत माहिती दिली. घटनास्थळी आरोपीने पंचासमक्ष शेणामातीच्या उकिरड्यातून बालकाचे प्रेत दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत काढून दिले.
दरम्यान, चिखली पोलिसांनी त्याला या हत्येमागचे कारण विचारले असता, त्याने धक्कादायक कारण सांगितले. आरोपीच्या बहिणीला पाहण्यासाठी एक चांगले स्थळ आले होते. परंतु, नंतर ही सोयरीक बिनसली. ही सोयरीक मोडण्यामागे शेख हरूण शेख गणी यांच्या पत्नी म्हणजेच आरोपीच्या मामी कारणीभूत असल्याचा संशय त्याच्या डोक्यात बळावला. या संशयातूनच त्याने बालकाचे अपहरण केले व अतिशय थंड डोक्याने त्याचा घरी नेत दोरीने गळा आवळून खून केला, व मृतदेह पोत्यात घालून उकिरड्यात पुरला. हा बालक बेपत्ता झालेला असताना सर्व गाव त्याचा शोध घेत होते. तेव्हा आरोपी शेख अन्सार हादेखील शोध घेण्याचे नाटक करत होता. त्यामुळे सुरूवातीला त्याच्यावर कुणाचा संशय गेला नाही. परंतु, चाणाक्ष चिखली पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या माहितीआधारे त्याला उचलले आणि पोलिस चौकशीत तो पोपटासारखा बोलू लागला. आता या खुनाशी संबंधित सर्व पुरावे पोलिसांनी गोळा केले असून, अतिशय थंड डोक्याने आरोपीने हा खून केल्याचे पुढे येत असल्याने त्याला निश्चितपणे फासावरच चढविले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.