ChikhaliCrimeVidharbha

चोवीस तासांच्याआत अंबाशीतील बालकाच्या खुनाचा उलगडा!

– सख्ख्या आतेभावानेच आवळला अपहृत चिमुकल्याचा गळा, प्रेत शेणाच्या उकरड्यात पुरले!

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अंबाशी येथील मोहम्मद अहरान शेख हारुण (वय १०) या बालकाच्या अपहरण व निर्घृण खुनाचा चिखली पोलिसांनी ठाणेदार संग्राम पाटील यांच्या कुशल नेतृत्वात अवघ्या चोवीस तासात उलगडा करून आरोपीला जेरबंद केले आहे. या बालकाच्या सख्ख्या आतेभावानेच हा खून करून प्रेत पोत्यात गुंडाळून शेणाच्या उकरड्यात पुरल्याचे पोलिस तपासात दिसून आले असून, आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. काल रात्रीपासून पोलिस या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुंतलेले होते.

सविस्तर असे, की परवा (दि.२२ जुलै) पोलीस स्टेशन चिखली येथे फिर्यादी शेख हारुण शेख गणी (वय ३५) रा. अंबाशी यांनी तक्रार दिली की, त्यांचा मुलगा मोहम्मद अहरान शेख हारुण वय १० वर्ष हा दि.२२ जुलैरोजी सकाळी ०९.०० वाजता बाहेर खेळण्यासाठी गेला असता, परत आला नाही, म्हणून दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्याला पळवून नेले असावे, अशी तक्रार प्राप्त झाली. तक्रारीचे गांभीर्य पाहता, चिखली पोलीसांनी सदर प्रकरणी तात्काळ फिर्यादीच्या रिपोर्टवरुन अज्ञात आरोपी विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मातोंडकर, निखील निर्मळ, पोलिस उपनिरीक्षक शरद भागवतकर, नितीनसिंह चौहाण व पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे चार पथके तयार करुन त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देण्यात आल्या. ठाणेदार संग्राम पाटील यांच्यासह नमूद पथकांनी अपहरण झालेल्या बालकाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी अंबाशी व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असता, या बालकाला आरोपी शेख अन्सार शेख नाशीर (वय ३०) रा. अंबाशी याच्यासोबत जातांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पाहिल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी संशयीत शेख अन्सार यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सुरूवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास गुन्ह्यात अटक करुन अटकेदरम्यान अधिक विश्वासात घेतल्यानंतर त्याने पंचासमक्ष अपहरीत बालक नामे मोहम्मद अहरान शेख हारुण वय १० वर्ष याचे अपहरण करुन त्याचा गळा आवळून खून केला असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर बालकाचे प्रेत पोत्यात टाकून घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या उकीरड्यात पुरुन ठेवल्याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक, कार्यकारी दंडाधिकारी, शासकीय पंच, फॉरेन्सीक व्हॅनसह घटनास्थळी रवाना झाले असता, आरोपीने पंचासमक्ष शेणामातीच्या उकीरड्यातून एक पोते बाहेर काढले. सदर पोते खोलून पाहिले असता, त्यामध्ये संबंधित बालकाचे प्रेत दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत मिळून आले. हे प्रेत ग्रामीण रुग्नालय चिखली येथे आणून मरणोत्तर पंचनामा करण्यात आला.

चिखली पोलिसांनी अटक केलेला आराेपी.

आरोपीने बालक मोहम्मद अहरान याचे खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करुन त्याचा दोरीने गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर अपहरीत बालकाचे प्रेत पोत्यात भरुन घराच्या बाजूला असलेल्या उकीरड्यात पुरुन ठेवल्याप्रकरणी आरोपीविरुध्द कलम १०३ (१), १४० (१), २३८ भारतीय न्यायसंहिताप्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे. सदर आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्त्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मातोंडकर, निखील निर्मळ, पोलिस उपनिरीक्षक शरद भागवतकर, नितीनसिंह चौहाण गुन्हे प्रकटीकरण पथक अमोल गवई, प्रशांत धंदर, पंढरी मिसाळ, रोहीदास पंढरे, नीलेश सावळे, राहुल पायघन, सागर कोल्हे, रुपाली उगले, पोलीस हवालदार विकास देशमुख, विजय किटे, कडुबा मुंढे, चंद्रशेखर मुरडकर, सुनील राजपूत, गजानन काकड, सुनील रिंढे, विनोद ब्राम्हणे यांच्या पथकाने केली आहे.
————
कोणताही पुरावा व साक्षीदार मिळून आलेला नसतांना चिखली पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, डीबी पथक यांनी पोलीस तपासाचे कसब वापरुन सदर गंभीर व क्लिष्ट गुन्ह्याची उकल केल्याने चिखली पोलिसांचे नागरिकांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

अंबाशी येथून अपहरण झालेल्या चिमुकल्याचा निर्घृण खून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!