चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील अंबाशी येथून अपहरण झालेल्या अवघ्या दहा वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून झाल्याची बाब उघडकीस आली आहे. काल, दि.२२ जुलैरोजी या चिमुकल्याचे घरासमोरून अपहरण झाले होते. गावातीलच झोपडपट्टी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला असून, संशयावरून या मुलाच्या जवळच्या नातेवाईकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावातीलच नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली, आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे मृतदेहाला उकिरड्यात पुरले असल्याचे पोलिसांना सांगितले.
अंबाशी येथील हरूण शेख गणी यांचा मुलगा मोहम्मद अरहान (वय १०) हा घरासमोर खेळत असताना त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. तो खूप वेळ झाला तरी घरी आला नाही म्हणून घरच्यांसह शेजारील व्यक्तींनी शोधाशोध सुरू केली. परंतु, तो सापडला नाही. त्यामुळे या मुलाच्या अपहरणाची तक्रार चिखली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. दरम्यान, या मुलाचा आज मृतदेहच सापडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेने अंबाशी गावात हळहळ व्यक्त होत असून, चिमुकल्याच्या निर्घृण खुनाने चिखली तालुका हादरला आहे. चिखली पोलिस पुढील तपास करत आहेत.
चिमुकल्याला मारून पोत्यात घालून शेणाच्या उकिरड्यात पुरले!
दरम्यान, या निर्घृण खूनप्रकरणी पोलिसांकडून अपडेट हाती आले आहेत. या चिमुकल्याला खून केल्यानंतर आरोपीने त्याचा मृतदेह पोत्यात घालून शेणाच्या उकिरड्यात पुरला. रात्री पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 24 जुलैरोजी सकाळी साडेदहा वाजता अंबाशी येथे शोकाकुल वातावरणामध्ये त्या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सख्या आतेभावानेच या चिमुकल्याचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून, याप्रकरणी शेख अन्सार (वय २२) या आरोपीला पोलिसांनी कालच ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चिखली पोलिस कसून चौकशी करत आहेत. या चाैकशीत त्याने चिमुकल्याचा गळा आवळून खून केला व मृतदेह उकिरड्यात पुरल्याची कबुली दिली असल्याचे पाोलिसांनी सांगितले आहे.