ChikhaliHead linesMaharashtra

राज्यात २२ जुलै ते ३० ऑगस्ट ‘महावाचन उत्सव’!

बुलढाणा (संजय निकाळजे) – शाळा आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते. हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व शाळांमध्ये २२ जुलैपासून ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबविण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
advt.

महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्याबाबतचा निर्णय २२ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णयाने घेण्यात आला होता. गेल्या वर्षी ५ डिसेंबरला या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये ६६ हजार शाळा व ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमांस रीड इंडिया सेलिब्रेशन यांनी विनाआर्थिक मोबदला सहकार्य केले होते. २०२३-२४ मधील वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्यभरातील शाळांमध्ये 'महावाचन उत्सव '
वाचन उत्सव
महावाचन उत्सव उद्दिष्टे…

– वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे.
– मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे.
– दर्जेदार साहित्याचा व लेखक, कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे.
– विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर चालना देणे.
– विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकास चालना देणे.

या उपक्रमाचे अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावे व त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणी करता प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विषयातील नावाला दिलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र इत्यादी साहित्याची निवड करून वाचन करतील. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी १५० ते २०० शब्दाची मर्यादा असेल. उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारी एक मिनिटाची व्हिडिओ /ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. वाचनीय पुस्तकाचे ग्रंथालय प्रदर्शन हे पुस्तक मेळावे भरण्याची जबाबदारी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर अनुक्रमे गटशिक्षणाधिकारी व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची असणार आहे.


राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील इयत्ता ३ री ते १२ वी या इयत्तातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदणी अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी, इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्ता निहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!