Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaPolitical NewsPolitics

मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित; सरकारला आता १३ ऑगस्टची डेडलाईन!

– दुपारी गावातील महिलांच्या हाताने पाणी पिऊन सोडणार उपोषण

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, आज (दि.२४) त्यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली व दुपारी नारायणगडाचे मठाधीपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले. त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती. गावातील महिलांच्या हाताने पाणी पिऊन मी माझे उपोषण स्थगित करणार, असे जरांगे पाटील यांनी सांगितले होते. उपोषणाच्या पाचव्याच दिवशी जरांगे पाटलांची तब्येत कमालीची खालावल्याने त्यांना हे उपोषण सोडावे लागले असून, येत्या १३ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा उपोषण सुरू करणार, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले, की मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकर्‍यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विनाउपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असे जरांगे म्हणाले. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असे सांगून त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. ‘मंगळवारी रात्री माझी तब्येत खालावल्याने मराठा बांधवांना काळजी लागली होती. त्यामुळे ४० जणांनी माझे हात पाय दाबून धरले आणि मला सलाईन दिली. समाजाच्या मायेपोटी मी उपचार घेतले. आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे, असे समाजाचे म्हणणे होते. आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरतं. पण आता सलाईन लागल्यामुळे उपोषणाचा काही उपयोग नाही. मी सलाईन लावून उपोषण करणारा माणूस नाही. त्यामुळे आज दुपारी मी माझं उपोषण सोडणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारला पुन्हा एका महिन्याचा अल्टिमेटम त्यांनी दिला असून, येत्या १३ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा उपोषण सुरू करणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
————
देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका..
बीडच्या नेत्याचं पण तसेच केलं त्यांच्याच बापाने भाजप वाढवली त्यांनाच पाय खाली चिरडलं. ज्याच्या बापाने भाजप वाढवलं त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी संपवलं, मराठ्यांच्या ओढताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास तरी संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर याप्रसंगी टीकास्त्र डागले.
———–

मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढलं आहे. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक  केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होतं. पण त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!