काँग्रेसच्या धडकेने कामगार विभाग वठणीवर?; बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपास गती!
– आणखी ३० हजार बांधकाम कामगारांना देणार साहित्य!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाला कमिशनखोरीची कीड लागली असून, त्यामुळे साहित्यवाटप वेळेवर होत नाही, असा आरोप करत जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे नेतृत्वाखाली जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर दि. १८ जुलैरोजी धडक आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळेच की काय, हा विभाग चांगलाच वठणीवर आल्याचे दिसत असून, कामाला आणखी गती आल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसात लाभार्थ्यांनी पेट्या व गृहसंच आदि साहित्य घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसत असून, आजपर्यंत जवळपास एकूण ६ हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. आणखी ३० हजाराचे जवळपास बांधकाम कामगारांना सदर साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आजदेखील सदर वाटप सुरू आहे.
राज्य शासनाकडून जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये अर्ज ऑनलाईन करून मंजुरी मिळाल्यानंतर पेटी, गृहसंचसह विविध जीवनावश्यक साहित्य देण्यात येते. परंतु सदर साहित्य देताना खिशाला ‘चोट’ दिल्याशिवाय लाभ मिळत नसल्याचा आरोप नेहमीच ऐकावयास मिळतो. असाच आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला होता. त्यामध्ये कमिशन घेऊन लाभार्थ्यांना साहित्य देण्यात येत असून, यासाठीच साहित्य वाटप थांबवले जाते असाही आरोप त्यांनी केला. राहिलेले साहित्य वाटप करावे, ऑनलाइन केलेले अर्ज तात्काळ मंजूर करावे यासह इतर मागण्या घेऊन राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेसच्यावतीने १८ जुलै रोजी स्थानिक जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी साहित्य वाटप सुरूच असून त्याला आणखी गती देण्यात येईल, असे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी आनंद राठोड यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यामुळेच की काय, गेल्या दोन दिवसात साखरखेर्डा, बुलढाणा, मोताळा , चिखली आदी सेंटरवरून बांधकाम कामगारांना पेट्या व गृहसंच वाटपाला आणखी गती आल्याचे दिसत आहे. आजपर्यंतचा साहित्य वाटपाचा हा आकडा ६ हजाराचे जवळपास आहे. आणखी टप्प्याटप्प्याने ३० हजाराचे जवळपास बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बांधकाम कामगारांना साहित्य मिळण्यासाठी या कार्यालयात कोणीही पैसे घेत नसून पूर्णतः निःशुल्क साहित्य वाटप करण्यात येते. यासाठी बाहेरील दलाल व एजंट पासून मात्र सावध राहावे. फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
– आनंद राठोड, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा
कामगारांच्याप्रश्नी काँग्रेस आक्रमक; जिल्हा कामगार कार्यालयावर धडकला धडक मोर्चा!