चिखली तालुक्यातील शेतकर्यांना मिळणार ७७.७८ लाख रूपयांचा पीकविमा!
चिखली (महेंद्र हिवाळे) – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पीकविमा नुकसान भरपाईप्रकरणी पीकविमा कंपनीशी चर्चा करून तंबी दिल्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्यांचा पीकविम्याचा प्रश्न मार्गी लागला असून, जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम मिळण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार, चिखली तालुक्यातील शेतकर्यांच्या खात्यावर ७७ लाख ७८ हजार ६७० रूपयांची पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम पडणार आहे.
सविस्तर असे, की बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विभागांची आढावा बैठक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली होती. या बैठकीत पीकविमासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकार्याला धारेवर धरत, पीकविम्याचे पैसे शेतकर्यांच्या खात्यात अजूनपर्यंत का जमा झाले नाहीत, असा जाब ना. जाधव यांनी विचारला होता. व या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. त्यानंतर प्रशासकीस्तरावर वेगवान हालचाली होऊन विमा कंपनीने पीकविमा नुकसान भरपाईपासून प्रलंबित असलेल्या शेतकर्यांच्या याद्या तयार करून रक्कम त्यांच्या खात्यात अदा करण्यासंदर्भातील कारवाई केली आहे. त्यानुसार चिखली तालुक्यातील १,१०५ शेतकर्यांना ७७ लाख ७८ हजार ६७०.३३ रुपये तर खामगाव तालुक्यातील २२६६ शेतकर्यांना ५ कोटी ५० लाख ३० हजार ७३५ रुपये, मेहकर तालुक्यातील १६१३ शेतकर्यांना १ कोटी ८५ लाख ४६ हजार ५८३.०४ रुपये, सिंदखेडराजा तालुक्यातील १०१० शेतकर्यांना१ कोटी ६३ लाख ७५ हजार ६८४.४१ रुपये असे एकूण बुलढाणा जिल्ह्यातील ७८२० शेतकर्यांना पीक नुकसानीपोटी १२ कोटी ३१ लाख ४५ हजार ७९५.५० रूपयांचा निधी मंजूर झाला असून, आज दि. २४ जुलैपासून शेतकर्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे.