Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraVidharbha

पीकविम्याची फुटकी कवडीही मिळाली नाही; जिल्ह्यातील आमदारांच्या घोषणा हवेतली तलवारबाजी ठरल्या!

– सोशल मीडियावर जोरदार हवा निर्माण करणार्‍या आमदारांनाही पीकविमा कंपनीने तोंडावर पाडले!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपूर्वी पीकविमा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होईल, अशाप्रकारची जोरदार हवेतील तलवारबाजी करत, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांनी जोरदार हवा निर्माण केली होती. परंतु, आज ३१ ऑगस्ट संपला तरी शेतकर्‍यांच्या खात्यावर पीकविम्याची फुटकी कवडीही जमा झाली नाही. पीकविमा कंपनीने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने तर पुसलीच; पण भाजप-शिंदे गटाच्या आमदारांना चांगलेच तोंडावर आपटले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह सिंदखेडराजा तालुक्यातील जवळपास ३० ते ४० हजार शेतकर्‍यांनी सन २०२३-२०२४ साली खरीप व रब्बी पिकांचा विमा काढला होता. पीक नुकसान भरपाईपोटी विमा मंजूर झाल्यानंतरही पीक विमा कंपनीने शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा न केल्याने शेतकरीवर्गात पीकविमा कंपनीविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ४ सप्टेंबररोजी संपूर्ण मतदारसंघात रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.

इतके आमदार आणि स्वतः कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पीकविमा कंपनीने तोंडावर पाडले.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री डॉ. संजय कुटे, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना भेटून पीकविम्याचा प्रश्न मांडला होता. पीकविमा कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलावून धनंजय मुंडे यांनी शेतकर्‍यांना सरसकट पीकविमा देण्याचे आदेश दिले होते. याची व्हीडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. या बैठकीबाबत सत्ताधारी आमदारांनी सोशल मीडियावर जोरदार स्टंटबाजीही केली होती. आमच्यामुळेच शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम मिळणार असल्याचा जोरदार तोराही त्यांनी मिरवला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळाला, अशी भावना सर्वांना वाटत होती. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंत ज्यांनी ऑनलाईन नुकसान भरपाई म्हणून पीकविमा मिळायला पाहिजे होता, त्यांनाही विमा कंपनीच्या अधिकार्‍यांनी तोंडाला पाने पुसली. बाकी शेतकर्‍यांना तर दमडीही मिळाली नाही. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आणि जिल्ह्यातील सहा आमदार सत्ताधारी असताना साधा पीकविम्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नसल्याने शेतकरीवर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पीकविम्याचे पैसे मिळावेत यासाठी सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व शेतकरी संपूर्ण मतदारसंघात ४ सप्टेंबररोजी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश तुपकर, सरपंच नितीन ठोसरे, सरपंच साधना अशोक खरात, सरपंच बबनराव काळे, सरपंच गजानन देशमुख, सरपंच मनोहर बुंधे, सरपंच भास्करराव गारोळे, सरपंच सुमनताई जगताप, माजी सरपंच तोताराम ठोसरे, माजी सरपंच शिवाजी लहाने, माजी सरपंच कमलाकर गवई, यासह सरपंच संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.


पीकविमा कंपनीसह सत्ताधारी आमदारांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच शेतकर्‍यांना फसवले. विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर असल्याने फक्त बाईट देऊन केंद्रीयमंत्री व सत्ताधारी आमदार निघून गेले. काय तर म्हणे, ३१ ऑगस्टपूर्वी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीकविमा रक्कम मिळेल व कंपनीने अपात्र केले अशा शेतकर्‍यांना त्यांना पात्र करून पीकविमा रक्कम ३१ ऑगस्टपूर्वीच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल, व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्यासमोर पत्रकारांना बाईट दिली होती, की पीकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले असून, तो निश्चित मिळणार आहे. मग विमा अनुदानाचे आता काय झाले? हे विमा कंपनीला जिल्ह्यातील आमदार यांनी विचारायला हवे. कृषिमंत्री यांनासुद्धा विचारा. अन्यथा निवडणुका आहेच समोर, मग शेतकरी दाखवून देईल, असा इशारा शेतकरी नेते चरणसिंह राजपूत यांनी दिलेला आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!