मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ; बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना तडाखा!
– सोयाबीन, कपाशीसह शेतीपिकांचे अतोनात नुकसान!
नांदेड/छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – मराठवाडा, विदर्भ व खान्देशात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे ग्रामीण जनजीवनाची दाणादाण उडाली होती. मुसळधार पावसामुळे नद्यानाल्यांना पूर आले असून, नदीकाठच्या गावांत व शेतात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान व प्राण्यांची जीवितहानी झाली आहे. सोयाबीन, कपाशी यासह इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली, नांदेड, विदर्भातील बुलढाणा, व खान्देशातील जळगाव जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून, येत्या २४ तासासांठी मराठवडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा हा धुमाकूळ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही असण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर उद्याही कायम असण्याची शक्यता आहे. या पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घालताना छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी व हिंगोलीत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने दाणादाण उडवली होती. जोरदार पावसाने जायकवाडी धरण जवळपास भरले आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने वडसद या नाल्याला पूर आला आहे. पुरामुळे नाल्याने रौद्ररूप धारण केले होते. या पुरात या भागातील शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरात पुराचे पाणीसुद्धा शिरले होते. जळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात २४ तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नागापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे परळी शहरासह १५ गावांना पाणी पुरवणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे. धरणातील पाणी वाण नदीपत्रात सोडल्यामुळे नदीचे पाणीही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. परळी-बीड रस्त्यावरील पापनाशिनी नदीवरील पूल वाहून गेला असून, त्यामुळे अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. वाहतूक नागापूरमार्गे शिरसाळाकडे वळवण्यात आली आहे. जायकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने पाण्याची आवक वाढू शकते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास १०० गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या २४ तासासांठी मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. याचबरोबर इतर भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस बरसत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. छत्रपती संभाजीनगर, वाशीम, परभणी, नांदेड सह जालना, हिंगोली, बीड, धाराशिव मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. उमरखेड तालुक्यातल्या मार्लेगाव इथं असलेल्या कयाधू नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा पूल पोलिसांनी वाहतूकीसाठी बंद केला आहे. परभणी जिल्ह्यात ५२ मंडळा पैकी ५० मंडळात ६५ ते ३०० मिली पेक्षा जास्त पाऊस झाल्यानं इथं अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.कारपरा नदीला पुअर आलयानं जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा ओढा बसला आहे, त्यामुळे ४० गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. भारतीय लष्कराची तुकडी इथे बचावकार्यासाठी दाखल झाली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडलं जात आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे विष्णूपुरी धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. छ्त्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धरणाचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धाराशिव इथं गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या अनेक भागांना पावसानं झोडपून काढल्यामुळे शेती पिकांचं देखील नुकसान झालं आहे. या सर्व भागातल्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. गेल्या दोन दिवसात संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसामुळे खरीप हंगामातील पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अधिक पाऊस झाला असून काही ठिकाणी अजूनही पाऊस पडतो आहे, त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून पावसाचा जोर कमी होताच जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागानं पंचनामे करावेत,असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.