– सप्टेंबर उजाडला तरी शेतकर्यांच्या खात्यावर पीकविमा जमा नाही
– यश हे आंदोलनातूनच मिळते हे स्पष्टच झालं – विनायक सरनाईक
चिखली (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यात अपयशी ठरलेले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आ. संजय कुटे, आ. संजय गायकवाड, आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ. संजय रायमूलकर यांना अपयश आल्यानंतर याप्रश्नी शेतकरी नेत्यांनी या लोकप्रतिनिधींवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यात जिल्ह्यातील नेते अपयशी ठरले असून, सप्टेंबर उजाडला तरी शेतकर्यांच्या खात्यावर पीकविमा जमा नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर जेव्हा शेतकरी घेऊन मुंबईला जातात, तेव्हा ते पीकविमाच घेऊन येतात. या नेत्यांनी कृषिमंत्र्यांसोबत बैठक घेऊन फक्त पुढची तारीख आणली. शेतकर्यांना यश हे फक्त आंदोलनातूनच मिळते, अशा शब्दांत शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र डागले आहे.
सविस्तर असे, की शेतकर्यांच्या खात्यावर खरीप, रब्बीचा तातडीने पीकविमा टाकण्यात यावा, अपात्र शेतकर्यांना पात्र करून त्यांना पीकविमा देण्यात यावा, तुटपुंजी रक्कम मिळालेल्या शेतकर्यांना भरीव रक्कम मिळावी, यासाठीचा तफावतीचा अहवाल शासनाला पाठवून कंपनीला उर्वरीत रक्कम देण्यास बाध्य करावे, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आक्रमक झाले आहेत. यापूर्वीसुद्धा विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्या आंदोलनातून शेतकर्यांच्या अनेक मागण्या मान्य करून घेण्यास यश आले. दुसरीकडे, मात्र मंत्रालयात जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत कृषिमंत्री यांनी पीकविमाप्रश्नी बैठक घेतली, परंतु यापूर्वीच तारीख पे तारीख दिली जात असतांना पुन्हा एकदा रखडलेला पीकविमा मिळण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ ची तारीख कृषिमंत्र्यांनी दिली होती. परंतु ती तारीखदेखील संपली असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मंत्रालयात बैठकीला गेले अन् पीकविमा मिळण्याची फक्त पुढची तारीखच घेऊन आले हे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर महिना उलटला तरीसुद्धा शेतकर्यांना पीकविमा मिळाला नाही, ही शेतकर्यांची फसवणूक असून, ही फसवणूक जिल्ह्यातील त्या बैठकीत असलेले नेत्यांनीच केली आहे. मागील तीन वर्षे रविकांत तुपकर हे मुंबईला शेतकरी घेऊन जातात तर पीकविमा घेऊन येतात, आणि सत्तेतील नेते मंत्रालयात बैठक घेतात तर तारीखच घेऊन येतात, असे आता शेतकरी म्हणत आहेत. तर यापूर्वीच्या विविध आंदोलनातून तुपकरांनी जिल्ह्यात मिळवून दिलेल्या २२९ कोटीच्या पीकविम्याच्या पोस्ट व कृषीमंत्री यांच्या निष्फळ ठरलेल्या बैठकीचे फोटो शेतकरी व्हायरल करीत असून, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातूनच आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी शेतकर्यांची फसवणूक केल्याचा घणाघात विनायक सरनाईक यांनी केला आहे.
——–
आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे!
सद्या राज्यभर सोयाबीन-कापूस दरवाढ, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व पीकविम्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, याप्रश्नी रविकांत तुपकर यांनी ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे व राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन जात धर्म, पक्ष संघटना विरहित होणार असून, या आंदोलनात पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन विनायक सरनाईक यांनी केले आहे.
पीकविम्याची फुटकी कवडीही मिळाली नाही; जिल्ह्यातील आमदारांच्या घोषणा हवेतली तलवारबाजी ठरल्या!