चोरट्यांचे पोलिसांना ओपन चॅलेंज!; साखरखेर्डानंतर आता सिंदखेडराजात भरसकाळी महिलेला लुटले!
– साखरखेर्डापाठोपाठ सिंदखेडराजा येथील घटनेने परिसरात भीतीचे वातावरण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा येथील चिखली अर्बन बँकेतील कॅश काउंटरवरून शेतकर्याच्या थैलीतील दीड लाख रूपये भरदिवसा उडविणार्या चोरट्यांना पकडण्यात अद्याप साखरखेर्डा पोलिसांना यश आले नसून, या घटनेची शाई वाळत नाही तोच, सिंदखेडराजा येथे एका महिलेच्या अंगावरील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा चोरटे ग्रामस्थांना लूटत असताना पोलिस मात्र मूग गिळून बसले आहेत. चोरट्यांनी पोलिसांना खुलेआम ओपन चॅलेंज दिले असून, लोकांना लुटून चोरटे पसार होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
सविस्तर असे, की साखरखेर्डा येथे चिखली अर्बन बँकेच्या काऊंटरवरुन ग्राहकांचे एक लाख ५० हजार रुपये हातोहात उडवून चोरटे पसार झाले होते. भरदिवसा दुपारी ही घटना घडली होती. त्या घटनेला तीन दिवस होत नाही, तोच सिंदखेडराजा येथील एका महिलेच्या अंगावरील दागिने सकाळी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटून नेले आहेत. सिंदखेडराजा येथील सुमनताई छबुलाल मेहेत्रे (वय ५०) या महिला नातवाला सोबत घेऊन खंडोबाच्या मंदिरात दर्शनासाठी सकाळी निघाली होत्या. दोन मोटारसायकल स्वार चोरट्यांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागिने काढण्यास धमकावले. नातू सोबत असल्याने काही बरेवाईट होऊ नये, म्हणून महिलेने अंगावरील दागिने चोरट्यांना दिले. सकाळी रस्ता सामसूम असल्याने चोरट्यांनी ही संधी साधून दागिने लुटले आहे. उपरोक्त घटनेची तक्रार सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांना चिखली अर्बन बँकेने आर्थिक मदत द्यावी – सोभागे
साखरखेर्डा येथील घटनेसंदर्भात शिवसेना तालुका उपप्रमुख दिलीप सोभागे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांना निवेदन दिले आहे की, भरदिवसा साखरखेर्डा येथील चिखली अर्बन बँकेत चोरट्यांनी काऊंटरवरुन प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्या थैलीतील एक लाख पन्नास हजार रुपये चोरुन नेले. सदर आरोपी हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहेत. त्यांचा शोध घेऊन चोरट्यांना अटक करावी. तसेच चिखली अर्बन बँकेत चोरी झाल्यामुळे याला बँक जबाबदार असून, ती जबाबदारी बँकेच्या अध्यक्षांनी घ्यावी, असे नमूद केले आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी चोरटे साखरखेर्डा येथे मोकाट फिरतात. ट्रॉफीक पोलीस प्रत्येक रस्त्यावर उभे राहून पेट्रोलिंग करतात. तरीही दिवसा चोरी करुन टिबल सिट बसून चोरटे फरार होतात. हा गंभीर विषय झाला आहे. सिंदखेडराजा येथेही दिवसा महिलांना लुटतात यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.