Uncategorized

‘शिंदे सेना’ राज्यात ११३ जागा लढणार; संभाव्य मतदारसंघांत जोरदार मोर्चेबांधणी!

– संभाव्य मतदारसंघनिहाय ४६ प्रभारी व ९३ विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती

बुलढाणा (बाळू वानखेडे) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ‘शिंदे सेना’ कामाला लागली असून, राज्यातील ११३ विधानसभा मतदारसंघासाठी ४६ प्रभारीसह ९३ विधानसभा निरीक्षक नेमले आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११३ जागांची तयारी सुरू केल्याची राजकीय चर्चा आहे. यामध्ये केंद्रात शिंदे सेनेचे एकमेव मंत्री असलेले प्रतापराव जाधव यांच्याकडे मेहकर, बुलढाणासह बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बाळापूरचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख गुवाहाटीवरून परत आल्याने चांगलेच चर्चेत राहिले होते. तर लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांच्याविरोधात त्यांनी चांगलेच रान उठवले होते. नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य भावना गवळी यांच्याकडे रिसोडसह देवळी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
prataprao jadhav eknath shinde and uddhav thackeray
बुलढाण्यात विधानसभेतही शिवसेनाविरुद्ध शिवसेना लढत.

विधानसभा निवडणूक दोनेक महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आपलाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त जागा लढण्याची तयारी केली जात आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ११३ विधानसभा जागावर ४६ प्रभारी व ९३ विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती करून जास्तीत जास्त जागी निवडणूक लढवण्याची तयारी चालवण्याचे सध्यातरी दिसत आहे. यामध्ये नुकतेच केंद्रात आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदार सांभाळणारे शिवसेना शिंदे गटाचे एकमेव मंत्री व बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे मेहकर, बुलढाणासह अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बाळापूर मतदार संघाचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळी गुवाहाटीतून माघारी फिरले होते. शिवाय, त्यांनी शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केल्याने चांगलेच चर्चेत आले होते. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ. नितीन देशमुख यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांच्याविरोधात प्रचारात रानदेखील उठवले होते. लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर नाराज झालेल्या वाशिमच्या भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचेकडे रिसोड, देवळी विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, मंत्री दादा भुसे यांच्याकडे साक्री, मालेगाव व मालेगाव (ग्रामीण), मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सिल्लोड व कन्नड, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव ग्रामीण, चोपडा व मुक्ताईनगर, मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे उमरगा व परांडा, मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सावंतवाडी तर शंभूराज देसाई यांच्याकडे कोरेगाव, पाटण व मान या मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांना दापोली, रत्नागिरी व राजापूरचे प्रभारी करण्यात आले आहे. नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्याकडे जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, परभणी व गंगाखेड, खा. नरेश मस्के यांच्याकडे पालघर, डहाणू व बोईसर, गुहागर विधानसभेच्या प्रभारीपदाची जबाबदारी उदय सामंत व रविंद्र फाटक तर निरीक्षक म्हणून सुशांत शेलार तसेच दापोलीच्या निरीक्षकपदी सुभाष सावंत यांना नेमले आहे. खासदार मिलिंद देवरा यांच्याकडे वरळी व शिवडी, पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्याकडे अलिबाग महाड व कर्जत, खा. संदीपान भुमरे यांना पैठण, छत्रपती संभाजी नगर (मध्य ), किरण पावसकर यांच्याकडे जुन्नर, खेड-आळंदी, नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य कृपाल तुमाने यांच्याकडे भंडारा, रामटेक, उमरेड व चंद्रपूर विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या दुप्पट विधानसभा मतदारसंघात तयारी चालवत असल्याने जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्यासाठी यानिमित्ताने भाजपवर दबाव टाकण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचे या निमित्ताने राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


महायुतीच्या जागावाटपात बुलढाणा व मेहकर-लोणार हे दोनच विधानसभा मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाटेला येणार असल्याची खात्रीशीर माहिती असून, खामगाव, जळगाव जामोद व चिखलीत भाजपचे विद्यमान आमदार हेच पुन्हा उमेदवार राहतील. तर सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे उमेदवार राहतील, असेही सांगितले जात आहे. तथापि, या विद्यमान आमदारांच्याविरोधात शरद पवार व उद्धव ठाकरे हे कोण उमेदवार देणार, यावर या मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. बुलढाण्यात संजय गायकवाड यांची विकासकामे बोलत असून, तेथे काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) लढण्यास उत्सुक आहेत. तर चिखलीत शेतकरी नेते रविकांत तुपकर व काँग्रेसचे राहुल बोंद्रे हे मैदानात उतरू शकतात. सिंदखेडराजामध्ये शिंगणे घरातील उमेदवार दिला जाण्याची चर्चा असली तरी, तेथे विरोधकांकडून वंजारी समाजातील सक्षम उमेदवार दिला जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रविकांत तुपकर याही मतदारसंघात उतरू शकतात. सद्या तरी येथे  डॉ. गणेश कायंदे व दिनेश गीते यांची नावे चर्चेत आहेत. मेहकरातून माजी आयएएस अधिकारी सिद्धार्थ खरात हे मैदानात उतरण्याची शक्यता असून, त्यांना उद्धव ठाकरे तिकीट देतात, की रविकांत तुपकर पाठिंबा देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खामगावात पुन्हा एकदा फुंडकर-सानंदा लढत रंगण्याची शक्यता आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!