BULDHANAHead linesVidharbha

सिद्धार्थ खरात यांनी आता आमदार व्हावे! गौरव सोहळ्यात दिग्गज मान्यवरांचा सूर!!

– विकास हा कृतीचा विषय; आता विकासासाठीच झटणार- सिद्धार्थ खरात

बुलढाणा (राजेंद्र काळे) – सिद्धार्थ खरात यांनी गृहविभागातील सहसचिव पदाचा राजीनामा दिला. नोकरी करीत असताना त्यांनी प्रचंड सामाजिक कामं केली. जनसामान्यांचे प्रश्न सोडविले. त्यांच्या विकासात्मक कार्याला अधिक वेग यावा, यासाठी त्यांनी आता राजकारणात येऊन आमदार व्हावे, असा सूर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी काढला. सिद्धार्थ खरात यांच्या सेवागौरव येथील गोवर्धन सभागृहात शनिवार, दि. 27 जुलै रोजी सायंकाळी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक होते. या कार्यक्रमात ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते सिद्धार्थ खरात यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांची पगडी घालून सन्मान करण्यात आला. प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख, सेवानिृत्त उपजिल्हाधिकारी सुनिल शेळके, निवृत्त उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे संचालक प्रा. डॉ. नरेश बोडखे, जिल्हा कार्यकारी अभियंता डी.टी. शिपणे होते.

यावेळी पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, सिद्धार्थ खरात, सुनिल शेळके, दिनेशचंद्र गिते यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यायचे ठरविले आहे. यापैकी सुनिल शेळके हे जयश्रीताई शेळकेंच्या आमदारकीसाठी प्रयत्नरत आहेत. तर दिनेश गिते अन् सिद्धार्थ खरात हे स्वत: राजकारणात येऊन राजसत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या तिघांनाही मन:पूर्वक शुभेच्छा आहेत. सिद्धार्थ खरात या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप बोलण्यासारखं आहे. संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी शासकिय नोकरी मिळविली. ते मुंबईत गेले, पण त्यांचे लक्ष नेहमी बुलढाणा जिल्ह्याकडे राहिले. आपल्या जिल्हावासियांच्या कल्याणासाठी ते सतत झटत राहिले. अनेकांचे कामं करीत राहिले. अनेकांना पाठबळ देत राहिले. अशी माणसं समाजात दुर्मिळ आहेत. अशा माणसांची दखल घेणे, त्यांना साथ देणे हे आपले देखिल कर्तव्य आहे. त्यांनी आता बिनधास्तपणे राजकारणात याव. आमदार व्हावं. पुढे मंत्री, मुख्यमंत्रीसुद्धा व्हावे, असे ॲड. खेडेकर म्हणाले.
यावेळी राधेश्याम चांडक म्हणाले, की लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवराप्रमाणे फिलीपाईन्समध्ये तकलोबन बेट आहे. तेथे एवढ्या सुविधा आहेत की दररोज हजारो पर्यटक तेथे येतात. प्रचंड आर्थिक उलाढाल आहे. आपल्याकडे लोणार सरोवराचा अस्सल नैसर्गिक वारसा असूनही त्याचा विकास झाला नाही. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी तेथे अभ्यासासाठी जावे, असे जरी शासनाने पत्रक काढले, तरी तेथे गर्दी वाढेल, पण सुविधांची मात्र वाणवा आहे. अशापरिस्थितीत कोणी कशाला लोणार सरोवराचा अभ्यास करण्यासाठी येतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठीच उच्चशिक्षितानी आमदार, मंत्री झाले पाहिजे, असे बोलून भाईजींनी सिद्धार्थ खरात यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे संचालक प्रा. डॉ. नरेश बोडखे म्हणाले, की सिद्धार्थ खरात यांचा स्वभाव क्रांतीकारी आहे. त्यांच्यामध्ये राजकीय नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे. परिस्थितीचे चटके सहन केल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. सर्वसामान्यांप्रती कळवळा आहे. अस्सल हिंमतवान व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी उत्कर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रचंड कामं केली आहेत. आमदार होणे हे त्यांचे स्वप्न नाही, तर विकासात्मक परिवर्तन घडविणे हा त्यांचा ध्यास आहे, असे प्रा. नरेश बोडखे म्हणाले.
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुनिल शेळके म्हणाले, सिद्धार्थ खरात यांनी अनेकांना विविध व्यवसायासाठी मदत करुन आर्थिक सक्षम बनविले आहे. खरात यांनी आता नोकरी सोडली आहे. ते निश्चितच समाजासाठी ताकदीने काम करत राहतील. नोकरी सोडल्यामुळेच मी सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती करू शकलो. आता 6 डिसेंबर 2024 रोजी महापरिनिर्वाण हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खरं म्हणजे नोकरी सोडल्यामुळेच हे कार्य मी करू शकलो. त्याप्रमाणेच, सिद्धार्थ खरात यांनी जो सकारात्मक हेतू मनात घेऊन नोकरी सोडली. तो समाजसेवेचा, परिवर्तनाचा अन् विकासाचा हेतू पूर्णत्वास जावो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दिनेश गिते म्हणाले, की सोज्वळ अभ्यासू मंडळींनी राजकारणात येणे गरजेचे आहे. खरंतर ती काळाची हाक आहे. राजकारणातील विघातक शक्तींना रोखण्यासाठी सुशिक्षितांनी सदैव प्रयत्नरत राहावे. अगदी प्रत्यक्ष राजकारणात उतरावे. आमचे मार्गदर्शक असलेले सिद्धार्थ खरात यांनी चांगले पाऊल उचलले आहे. त्यांना विकासात्मक दृष्टी आहे. विशेष म्हणजे मेहनत करण्याची तयारी आहे. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडविण्याची प्रचंड क्षमता आहे.
जिल्हा कार्यकारी अभियंता डी.टी. शिपणे म्हणाले, की सिद्धार्थ खरात हे सर्वांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षण, जलसंधारण, गृह अशाच सर्वच विभागामध्ये त्यांनी काम केले आहे. लेखक अन् समाजसेवक म्हणून त्यांनी आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सकारात्मक कार्यक्रम ते पार पाडत आले आहेत. शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रचंड मदत त्यांनी केली आहे. साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्वोतपरी सहकार्य त्यांनी केले आहे.
यावेळी सिद्धार्थ खरात यांच्या पत्नी महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनीदेखिल मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, सिद्धार्थ खरात हे एक ध्येयवेडे व्यक्तिमत्त्व आहे. एखादी गोष्ट मनात ठरविली की ते पूर्ण करणारच. त्यांचा स्वभाव जिद्दी आहे. त्यांनी अत्यंत मेहनतीतून शिक्षणसंस्था उभी केली. उत्कर्ष संस्था उभारुन कायम समाजसेवेत झोकून दिले.
प्रास्ताविकपर भाषणात साहित्यिक रवींद्र साळवे म्हणाले, सिद्धार्थ खरात यांनी पोटाची अन् मेंदूची भूक भागविण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. ज्ञानाशी मैत्री करुन पुढे ते नोकरीला लागले. प्रशासनात मोठी खूर्ची मिळूनही त्यांचे लक्ष मातीत राबणाऱ्या माणसांकडे राहिले. मातीतत्या माणसांच्या व्यथा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. अन् त्याच धडपडीतून त्यांनी गाव, तालुका, जिल्ह्यातल्या माणसांसाठी यंत्रणा राबविली. ते गावाकडे येत राहिले. रमत राहिले. अन् गावकऱ्यांसाठी अन् आपल्या माणसांसाठी कार्य करत राहिले. या कार्यक्रमाला मेहकर, सिंदखेडराजासह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार संचालन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले. आभार ॲड.जयसिंगराजे देशमुख यांनी मानले. मानपत्राचे वाचन सौ. वैशाली तायडे यांनी केले. सोहळ्याच्या संपन्नतेसाठी आयोजक समितीचे राजेंद्र काळे, पुरुषोत्तम बोर्डे, ॲड. जयसिंराजे देशमुख, सुनील सपकाळ, प्रा.रविंद्र साळवे, प्रविण गीते, सोहम घाडगे, बाबासाहेब जाधव यासह समीतीने अथक परिश्रम घेतले.


विकास हा कृतीचा विषय; आता विकासासाठीच झटणार- सिद्धार्थ खरात

यावेळी सेवा गौरव सोहळा आयोजित करणाऱ्यांचे आभार सिद्धार्थ खरात यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मानले. युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पहिल्या भेटीबद्दलही ते भरभरुन बोलले. त्यानंतर स्वत:च्या संघर्षाबद्दल ते व्यक्त झाले. ते म्हणाले, ‘‘सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी हे माझे गाव. याच गावात चौथीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे गावापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या किनगावराजा येथे शिकलो. त्यानंतर त्यावेळचे औरंगाबाद अर्थात आजचे संभाजीनगरमध्ये ज्ञानार्जनासाठी गेलो. तेथे चळवळींमध्ये काम केले. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले, पण श्रीकांत देशमुख या मित्राने स्पर्धा परीक्षेचा मार्ग दाखवला. अन् त्यामध्ये यशस्वी झालो. पुढे मुंबईत गेल्यानंतर तेथे मंत्रालयात कक्ष अधिकारी पदावर असलेल्या सुवर्णा निकम यांच्यासोबत लग्न झाले. आम्ही दोघेही मंत्रालयात नोकरीवर असल्याने सर्व सुविधांनी सज्ज असा आमचा संसार सुरू राहिला, पण गावाकडल्या मातीकडे पाय वळत राहीले. मी गावाकडे जायचो. त्यांच्या वेदना पाहायचो. विविध स्तरावरील मित्र , गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती द्यायचो. त्या योजना मिळवून द्यायचो. माय-बाप जेथे राबराब राबले, त्या शेताच्या बांधाबांधावरून मी आजही जातो. ज्या शेतात माझी लवनी होंऊन दिवस दिवस भर काम करायची व काम करतांना स्वतः रचलेल्या ओव्या गोड आवाजात म्हणायची त्या गाण्याचा भास तेथे होतो. शाळेच्या व गावाकडच्या रस्त्यावरुन जातांना आई-वडील व त्यांच्या समवेतची तावेळची काबाडकष्ट करणारी माणसे मला दिसतात. गाव आणि भागातला नाळ कधीच तुटली नाही. मुंबईत वैभव दिसते, पण आशीर्वाद मात्र गावातल्या माणसांकडूनच मिळतो.” या भावना सिद्धार्थ खरात यांनी त्यांच्या सेवागौरव सोहळ्यात व्यक्त करत असतानाच आईची आठवण काढली तेव्हा सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. यावेळी ते गहिवरुन आले, अन् हॉल स्तब्ध झाला होता. स्वत:ला सावरत खरात त्यांनी व्यवस्थेबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, की महाराष्ट्राचा रेतीघाट करुन ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपला वारसा आणि वसा असतांना समाजकारण व राजकारणाने नैतीक अधःपतनाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत.. बुलढाणा ही शौर्य, संस्कार व नवनिर्मितीची भूमी आहे. याच भूमीतले लखुजीराव जाधव हे अत्यंत कर्तबगार पुरुष होते. ५ हजारी मनसबदार ते २१ हजार मनसबदारीपरंत पोहोचून ते निजामशाहीत वजीर झाले होते. ते ज्यांच्याकडे मनसबदार म्हणून राहायचे, त्यांचीच सत्ता राहायची. हा इतिहास आहे. ते स्वाभिमानी होते. करारी होते. कर्तव्यपरायण होते. तसेच संस्कारू देखिल होते आणि हेच संस्कार जिजाऊंमध्ये रुजले. जिजाऊंनी याच संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडविले. एवढा मोठा वारसा आपल्याकडे आहे. हीच प्रेरणा घेऊन यापुढे जनहितासाठी लढायचे आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, विद्रोह केल्याने कोणताही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आक्रोश अन् विद्रोहापेक्षा कृती महत्वाची आहे. यापुढे विकासासाठीच झटावे लागेल. हीच भूमिका घेऊन मी नोकरी सोडली आहे. नवनिर्मितीच्या विचारातून यापुढे नवक्रांती घडविण्यासाठी आपण सर्वांनी तयार रहावे.. अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!