Uncategorized

कृषी केंद्र चालकाने कृषी विभागाचा आदेश धाब्यावर बसविला; अनुदानतत्वावर बियाणे देण्यास नकार!

– मेरा बुद्रूकच्या दुकानदाराने शेतकर्‍यांकडे परमीट असतानाही अनुदान तत्वावर बियाणे न देता दुकानातून परत पाठवले!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – शिंदी येथील शेतकरी शासनाकडून मिळणारे अनुदान तत्वावर बियाणे घेण्यासाठी गेले असता, कृषी सेवा केंद्र संचालकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन रिकाम्या पावलांनी परत पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कृषी विभागाचे आदेश धाब्यावर बसवून शेतकर्‍यांशी उद्धटपणा करणार्‍या मेरा बुद्रूक येथील त्या कृषी केंद्रावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिंदी येथील सरपंच सौ. साधना अशोक खरात यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संबंधिथ शेतकर्‍यांसह केली आहे.
तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देताना शेतकरी खंडागळे.

शिंदी, पिंपळगाव सोनारा, राताळी, मोहाडी, तांदुळवाडी येथील अनेक शेतकर्‍यांची शेती ही चिखली तालुक्यातील सलग्न गाव शिवारात आहे. शेतीविषयक अनेक कामे त्यांना चिखली महसूल विभाग आणि कृषी विभागाशी सलग्न येतो. मेरा बुद्रूक शिवारात तांदुळवाडी आणि शिंदी येथील अनेक शेतकर्‍यांची शेती आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी शासनाकडून अनुदान तत्वावर बियाणे उपलब्ध झाले असून, मोबाईलवर मॅसेज आला आहे. ज्यांना हा मॅसेज आला त्यांनी कृषी सहाय्यक यांच्याकडून रितसर परमीट घेऊन सिंदखेडराजा तालुक्यात बियाणे वाटपही करण्यात आले.

शेतकर्‍यांना रितसर परमिटचे वाटप करण्यात आले असून बियाणे अनुदान तत्वावर देणे सुरु आहेत. चिखली येथील कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकर्‍यांना का परत केले याची चौकशी करण्यात येईल.
– ज्ञानेश्वर दंदाले, कृषी सहाय्यक, मेरा बुद्रूक

शेतकर्‍यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. तेथे शेतकर्‍यांना नागवल्या जात असून, शेतकर्‍यांची थट्टा करणार्‍या कृषी सेवा केंद्र संचालकांवर कार्यवाही करावी.
– साधना अशोक खरात, सरपंच, शिंदी

शिंदी येथील शेतकरी बालाजी कृषी सेवा केंद्र मेरा बुद्रूक येथे गेले असता, त्यांनी त्यांचीच शाखा असलेल्या चिखली येथील बालाजी कृषी सेवा केंद्रावर जाऊन बियाणे घेऊन या!, असा सल्ला दिला. शिंदी येथील शेतकरी ज्ञानेश्वर तेजराव खंडागळे हे चिखली येथे गेले असता, दुकानदारांनी थांबण्याचे सांगितले. खंडागळे आणि काही शेतकरी पाच ते सहा तास थांबले तरीही त्यांना बियाणे मिळाले नाही. त्यांनी बियाणांची मागणी केली असता, अपमानजनक भाषा वापरुन बियाणे मिळणार नाही, अशी भाषा वापरली आणि शेतकर्‍यांना आल्या पावली परत पाठविले. बियाणे उपलब्ध असताना केवळ अनुदान तत्वावर द्यावे लागते. जादा पैसे घेतायेत नाही, म्हणून हेतुपुरस्सर शेतकर्‍यांना परत पाठविणार्‍या कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!