– रेतीतस्करांना वरदहस्त कुणाचा? परिसरात संतापाची लाट!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील अवैध रेतीतस्करांनी हैदोस माजविला असून, महसूल विभागाच्या फिरते पथकांच्या नाकावर टिच्चून रेतीतस्कर रेतीची खुलेआम खुलेआम वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे. दिनांक १३ जूनच्या रात्री तर निमगाव वायाळ शिवारातील पूर्णा नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने रेतीचोरी सुरू असताना हे फिरते पथक कारवाईसाठी गेले असता, रेतीतस्करांनी आपले वाहन या पथकाच्या पुढे आडवे लावून नदीपात्रातील वाहने पळवून नेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे, की दिनांक १३ जूनच्या रात्री निमगाव वायाळ येथील रेतीतस्कर जेसीबी मशीनने खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करीत असल्याची गुप्त माहिती फिरते गौण खनिज पथकाला मिळाली होती. ही माहिती प्राप्त होताच पथकप्रमुख प्रभारी नायब तहसीलदार व सोबत एक तलाठी हे खासगी गाडीने निमगाव वायाळ येथील शिवारात दाखल होताच, रेती तस्करांचे लोकेशनवर असणार्या दोन चारचाकी गाडीने पथक प्रमुखांच्या गाडीच्या मागून पुढे जाऊन आपली गाडी त्यांना आडवी लावली. व नदीपात्रातील रेती उत्खनन करणारे जेसीबी व टिप्पर पळवून जाण्यास मदत केली. पथकाच्या गाडीला अडवून जर गाड्या पास होत असेल तर हे पथक काय कामाचे, असा सवाल निर्माण होत आहे. या कारवाईत महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पथक प्रमुखांच्या जर गाडीला दोन चारचाकी गाड्या आडव्या लागत असतील तर जवळपास २० ते ३० वाळूतस्कर हे एखाद्या वेळेस त्यांच्यावर जीवघेणा हल्लादेखील करू शकतात.