BULDHANAHead linesVidharbha

जिल्ह्यातील २०० कृषीकेंद्रांना मालविक्री बंदची ताकीद, ७१ दुकानांचे परवाने रद्द!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – खरिपाची पेरणी काही दिवसांवर आली असल्याने शेतकर्‍यांनी रसायनिक खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच काही गैरप्रकार होऊ नये, म्हणून जिल्हा कृषी विभाग चांगलाच सरसावला असून, तब्बल २०० कृषी केंद्रांना मालविक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. तर ७१ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून, ७ दुकानांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान विविध त्रुटी आढळल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

मान्सूनचे काही दिवसातच आगमन होणार असून, शेतीमशागतीची कामेदेखील अंतिम टप्प्यात आहेत. खरिपाची पेरणी करण्यासाठी वेळेवर घाई होवू नये, यासाठी शेतकर्‍यांनी रसायनिक खते तसेच बियाणे खरेदी करणे सुरू केले असून, विशेषतः पाऊस पडलेल्या भागात बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची चांगलीच लगबग दिसत आहे? शेतकर्‍यांना खते व बियाणे योग्य किमतीत आणि सर्टिफाईड कंपनीची मिळावी, यासाठी कृषी विभागदेखील कृषी विक्रेत्यावर करडी नजर ठेवून आहे. यासाठी विविध भरारी पथकेदेखील स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात जवळपास १६८२ परवानाधारक कृषी विक्रेते असून, कृषी विभागाकडून विविध दुकानांची तपासणीदरम्यान परवानामध्ये कंपन्या समाविष्ट नसणे, स्टेटमेंट वन टू वन नसणे, सीआयबी क्लेम लेबल नसणे इतर त्रुटी आढळल्याने जिल्ह्यातील तब्बल १७६ बियाणे विक्रेत्यांना बियाणे विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर २१ खतविक्रेते तसेच १० कीटकनाशक विक्रेत्यांना विक्रीबंदची ताकीद देण्यात आली आहे.

कृषी विभागाने आतापर्यंत केलेली कारवाई!

कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता करणार्या 176 दुकानांना कृषी विभागाने विक्री बंदचे आदेश दिलेले असून, त्यात खते 21 व कीटकनाशके 10 या निविष्ठांच्या विक्रीचे आदेश आहेत. तसेच 71 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून, 7 दुकानांचे परवाने निलंबीत करण्यात आलेले आहेत.

शिवाय, परवान्याचे नूतनीकरण नसल्याने व कृषी सेवा केंद्र बंद असल्यामुळे ७१ कृषी दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. साठा रजिस्टर अद्यावत नसणे, साठा व भावफलक सद्यावत नसणे, परवाना नूतनीकरण नसणे, परवाना मान्य कंपनीचे नावाने शेतकर्‍याची बिलावर सही घेणेसह इतर त्रुटी आढळल्याने ७ कृषी दुकानांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने कृषी विभाग चांगलाच अ‍ॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!