ChikhaliCrimeHead linesVidharbha

स्प्रिंकलर तोट्या चोरणारी टोळी जेरबंद करण्यात चिखली पोलिसांना यश

– मिसाळवाडी, मेरा, भरोसा येथील तोट्या चोरीचाही लवकरच लागणार छडा!
– ठाणेदार संग्राम पाटील, डीबी पथकाचे प्रमुख नितीनसिंह चौहाण यांची धडाकेबाज कारवाई!

चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली पोलिस ठाणेहद्दीतून स्प्रिंकलरच्या तोट्या चोरणार्‍या टोळीसह या तोट्या विकत घेणार्‍या मेहकर येथील एका व्यापाराला चिखली पोलिसांच्या डीबी पथकाने जेरबंद केले आहे. चोरट्यांकडून तोट्यांसह सुमारे १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, आरोपींनी गोद्री येथील चोरीची कबुली दिली आहे. चिखली तालुक्यातील मिसाळवाडी, मेरा परिसर, भरोसा येथील शेतकर्‍यांच्याही स्प्रिंकलरच्या तोट्या चोरीस गेलेल्या आहेत. या चोर्‍यादेखील याच टोळीने केलेल्या असण्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिस कसून तपास करत आहे. या आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

सविस्तर असे, की गोद्री येथील शेतकरी सुरेश रामराव खरे यांनी त्यांच्या शेतातून स्प्रिंकलरच्या तोट्या, व इतर शेतीसामान चोरीला गेल्याची तक्रार चिखली पोलिसांत दाखल केली होती. त्यांच्या शेजारच्या शेतकर्‍याच्यादेखील तोट्या व सामान चोरीला गेले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता, ठाणेदार संग्राम पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास डी बी पथकाचे प्रमुख नितीनसिंह चौहाण या धडाकेबाज अधिकार्‍याकडे सोपवला. चव्हाण यांनी आपली यंत्रणा कामाला लावली असता, त्यांना मेहकर फाटा येथे काहीजण तोट्या घेऊन येणार असल्याचे कळाले. पोलिस पथकाने सापळा लावला असता, १३ जूनरोजी दोन मोटारसायकलद्वारे जाणारे आरोपी त्यांना सापडले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे तोट्यांचे तुकडे आढळून आले. या आरोपींना चिखली पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली गेली असता, त्यांच्या चौकशीतून मोठे रॅकेटच हाती लागले. तसेच, त्यांनी गोद्री येथील स्प्रिंकलर तोट्यांच्या चोरीची कबुली दिली. तसेच, त्यांच्यासोबतचे काही आरोपी हे मेहकर येथे तोट्या विक्रीस गेल्याचेही त्यांनी डी बी पथकाला सांगितले. या माहितीवरून डी बीचे पथक मेहकर येथे गेले असता, मेहकर बाजारात आरोपींचा शोध घेण्यात आला. तेथे उर्वरित आरोपी मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. या सर्व आरोपींना चिखली पोलिस टाण्यात आणण्यात येऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. राकेश इंत्तु पवार रा. सुकळी ता. मेहकर, कन्हैया बनारस पवार रा. सुकळी ता. मेहकर, भास्कर इससिंग पवार रा. साकेगाव ता. चिखली, रविंद्र खंडू पवार रा. अंत्रीकोळी ता. चिखली, ज्योती रविंद्र पवार रा. अंत्रीकोळी ता. चिखली, आशाफुला नितीन पवार रा. अंत्रीकोळी ता. चिखली अशी या आरोपींची नावे असून, त्यांची चिखली पोलिस ठाणेहद्दीतील इतरही ठिकाणी केलेल्या स्प्रिंकलर तोट्यांच्या चोरीसह शेतीसामानाच्या चोर्‍यांची कबुली दिली.

स्प्रिंकलरच्या तोट्या चोरल्यानंतर हे आरोपी मेहकर येथील व्यापारी रमेश अनंतराव मैंद याच्याकडे त्या विकत होते. डी बीच्या पथकाने या व्यापार्‍याच्या दुकानावर धाड घातली असता, तेथे स्प्रिंकलर तोट्या मिळून आल्या. या व्यापार्‍याची चौकशी केली असता, त्याने या चोरट्यांकडून तोट्या घेतल्याची कबुली दिली. तसेच, त्याच्याकडून तोट्या व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व आरोपींना रितसर अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर ठिकाणी झालेल्या स्प्रिंकलर चोर्‍यांचीही माहिती हाती येईल, असा पोलिसांना विश्वास आहे. फौजदार नितीनसिंह चौहाण यांनी मोठ्या शिताफीने केलेल्या तपासामुळे स्प्रिंकलर तोट्यांची चोरी करून शेतकर्‍यांच्या नाकात दम आणणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. अटक केलेल्या एकूण सात आरोपींकडून स्प्रिंकलर तोट्या, तोट्यांचे तुकडे व भंगार, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली असा एकूण एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या सूचनेनुसार डीबी पथकाचे प्रमुख व धडाकेबाज अधिकारी नितीनसिंह चौहाण यांनी पोलिस नाईक अमोल गवई, पोकॉ प्रशांत धंदर, पंढरीनाथ मिसाळ, नीलेश सावळे, रोहीदास पंढरे, सागर कोल्हे, राहुल पायघन, राजेश मापारी, मपोकॉ रुपाली उगले, मपोहेकों माया सोनोने यांच्यासह तपास अधिकारी पोहेकॉ विकास देशमुख, पोकॉ संतोष जाधव पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!