BuldanaBULDHANAChikhaliCrimeHead linesMaharashtraPuneVidharbha

चिखली येथे ऑनलाईन संगणक टंकलेखन परीक्षेचा मोठा घोटाळा उघडकीस!

– पुण्यातील परीक्षा परिषदेच्या कार्यालयातून घोटाळ्याचा पर्दाफास!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे घेत असलेल्या इंग्रजी विषयाच्या ऑनलाईन संगणक टंकलेखन परीक्षेत आज (दि.१४) चिखली येथे मोठा घोटाळा उघडकीस आला. येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात २२ विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात फक्त १४ विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष २२ विद्यार्थ्यांनी अ‍ॅक्सेस घेतल्याचे दिसून आले. उर्वरित विद्यार्थी हे घरूनच परीक्षा देत असल्याचे उघडकीस आल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. याबाबत चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सविस्तर असे, की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत. आज (दि.१४) परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात २२ विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र १४ विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष २२ विद्यार्थ्यांनी अ‍ॅक्सेस घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखविण्यास सांगितले. मात्र त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते व इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत, असे विचारले गेले असता, केंद्रप्रमुख निरुत्तरित झाले. मात्र प्रत्यक्षात २२ ही विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे ऑनलाइन अ‍ॅक्सेस दिसत होते. याचा अर्थ इतर आठ विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते.
या परीक्षेचा युजर आयडी व पासवर्ड हा फक्त केंद्रप्रमुख यांच्याकडेच असतो. तरीही हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले? त्यामुळे बुलढाणा जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांनी तात्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला. बुलढाणा जिल्ह्यातील सातही परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारे हा घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला.

अनुराधा इंजिनियरींग कॉलेज, चिखली येथे २२ विद्यार्थी ऑनलाईन संगणक परीक्षा देत असल्याचे आढळून आल्याने इतर ८ विद्यार्थी ऑनलाईन संगणक परीक्षेचे आय.डी. पासवर्ड वापरून इतर कुठेतरी बसून सदर परीक्षा देत असल्याचे निष्पन्न झाल्याने अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या आदेशान्वये प्रकाश केवट केंद्र प्रमुख तथा केंद्र संचालक परीक्षा केंद्र अनुराधा इंजीयनियरींग कॉलेज यांनी आज दिनांक १४ जूनरोजी अनुराधा इंजिनीयरींग कॉलेज, चिखली येथील आय. टी. शिक्षक गजानन मोतीराम लाघे यांनी ऑनलाईन संगणक परीक्षेकरीता त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आय.डी.वर पाठविण्यात आलेले संगणक परीक्षेचे आय.डी. पासवर्ड, मॅक आय.डी. याचा गैरवापर करून इतर ८ विद्यार्थ्यांना इतर कुठेतरी बसवून सदरची संगणक परीक्षा देण्यास सहकार्य करण्यास मदत करून फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याबाबत पोलीस स्टेशन चिखली येथे तक्रार सादर केली आहे. या तक्रारीवरून सदर प्रकरणात अनुराधा इंजिनीयरींग कॉलेज, चिखली येथील आय.टी. शिक्षक गजानन मोतीराम लाघे रा. चिखली यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्रामसिंह पाटील हे करीत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
————
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण करून देणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय असल्याची खात्रीशीर माहिती असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून हजारो रूपये उकळले जात आहेत. यूझर आयडी व पासवर्ड हा केंद्रप्रमुखच पुरवत असून, त्यांनाही या घोटाळ्यात मोठा मलिदा मिळतो. त्यात अनेक टंकलेखन केंद्रांच्या संचालकांचाही हात असल्याचे खात्रीशीर सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. शिक्षण विभाग व पोलिसांनी या घोटाळ्याचा सखोल तपास करण्याची मागणी ऐरणीवर आलेली आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!