हेवेदावे विसरून विकासकामांसाठी एकत्र येण्याचे प्रतापरावांचे आवाहन मनाचा मोठेपणा!
– लोकसभा निवडणुकीत राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाल्याची केली खंत व्यक्त!
चिखली (महेंद्र हिवाळे) – निवडणूक झाली, आता सर्व हेवेदावे सोडून सर्वमिळून विकासाच्या कामाला वाहून घेऊ या, असे आवाहन नवनियुक्त केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीद्वारे केले होते. प्रतापरावांच्या या भूमिकेचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शेणफडराव घुबे यांनी स्वागत केले आहे. गढूळ झालेल्या राजकीय वातावरणात प्रतापरावांच्या या विधानाने सकारात्मक संदेश गेलेला आहे, असे सांगून, लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण फारच गढूळ झाले होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी संवाद साधताना शेणफडराव घुबे म्हणालेत, की आताच्या राजकारणाने हीन पातळी गाठल्याचा अनुभव आपण सर्वचजण अनुभवतो आहोत. विशेषतः बुलढाण्याचे नवनिर्वाचित खासदार व नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले प्रतापराव जाधव यांच्याविरोधात, लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या विरोधातील दोन्हीही प्रमुख विरोधी उमेदवारांनी अक्षरशः गरळ ओकली. निवडणुकीत कोणाची तरी हार-जीत होणारच होती. त्याचाच एक भाग म्हणून प्रतापराव जाधवांना खासदार म्हणून नियतीने विजयी ठरवले. एवढेच नाही तर त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळदेखील टाकली; यालाच म्हणतात नियतीचा खेळ. म्हणतात ना की, ‘जब खुदा देता है तो छप्पर फाडके देता है’. प्रतापराव जाधव यांनी आता मंत्रिपदाची शपथही घेतली, खातेवाटपही झाले, अन आज त्यांनी शेगावनगरीत येवून ‘श्री’चे दर्शन घेऊन जिल्ह्यात प्रथम पाऊलही ठेवले. हा सर्व त्यांच्या भाग्याचा योग व त्यांच्या तपश्चर्येचे फळ तर आहेच; परंतु त्यांच्या मंत्रिपदाने जिल्ह्याचेही भाग्य फळफळले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
शेणफडराव घुबे पुढे म्हणालेत, अत्यंत महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका व्यक्त करतांना आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला. ते म्हणालेत, ‘आता निवडणूक झाली. आपण सगळे जिल्ह्याच्या विकासासाठी निवडणुकीतले हेवेदावे विसरुन, सारेजण एकत्र येऊन, विकासाच्या कामात सामील होऊ होऊया’. त्यांचे हे मनोगत म्हणजे, त्यांच्या मनाचा मोठेपणा तर आहेच; परंतु, स्वतःच्या कर्तृत्वाचा आलेख उंच करण्याच्या दृष्टीने टाकलेले एक उदार पाऊलही म्हणावे लागेल. ही त्यांच्यासाठी अत्यंत गौरवाची व जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. विकासाच्या मुद्द्यांवर प्रतापरावांनी त्यांच्या राजकीय विरोधकांनादेखील साद घातली आहे, ही निश्चितच जिल्ह्याच्या विकासाची नांदी आहे. प्रत्येकाची काम करण्याची वेगळी हातोटी असते, दृष्टी असते. त्याची चुणूक या त्यांच्या वक्तव्यात दिसून येते, असे सांगून शेणफडराव घुबे यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या बदललेल्या भूमिकेचे जोरदार स्वागत केले आहे.
—————–