Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

‘महायुती’त सर्व काही ‘नॉट ऑलवेल’?; सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी अर्ज भरताना भाजप, शिंदे सेनेचे नेते गैरहजर!

मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्याचा प्रयत्न पक्षाचे प्रमुख अजित पवार हे करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हजर होते, परंतु महायुतीतील शिंदे सेना व भाजपचे नेते गैरहजर दिसल्याने याबाबत आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच, पक्षाचे मंत्री व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेदेखील नाराज असल्याची चर्चा असून, त्यांनी पक्षाकडे राज्यसभेसाठी संधी मागितली होती. परंतु, भुजबळांना डावलून सुनेत्रा पवार यांना अजित पवारांनी संधी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महायुतीत सहभागी असल्याने महायुतीचे सर्व नेते सुनेत्रा अजित पवार यांच्या राज्यसभेसाठी अर्ज भरण्याच्या प्रसंगी हजर राहतील, असा कयास होता. परंतु, त्या जेव्हा अर्ज भरण्यासाठी गेल्या तेव्हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते हजर होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा समावेश होता. तर भाजप व शिंदे सेनेचे नेते गैरहजर होते. महायुतीतील या नेत्यांची गैरहजेरी आता अनेकांना खटकली आहे. वास्तविक पाहाता, राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे इच्छुक होते. परंतु, त्यांना डावलून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. त्यामुळे भुजबळ हेदेखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत संधी देण्याचा निर्णय अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. अलिकडेच, केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला संधी मिळाली नसल्याने उलटसुलट चर्चा राज्यात होत आहे. त्यांना एक राज्यमंत्रीपद देऊ केले होते. परंतु, ते कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम राहिले, अशी माहिती भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘थिंक-टँक’नेदेखील अजित पवार यांना सोबत घेणे ही भाजपची चूक असल्याची टीका केली होती. अजित पवारांमुळे भाजपचे राजकीय मूल्य घसरल्याचे निरीक्षणही संघाने नोंदविले होते.
———
राज्यसभा सचिवालयाने राज्यसभेच्या सात राज्यांतील १० रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. यातील बहुतांश सदस्य हे लोकसभेसाठी निवडून गेल्याने या जागा रिक्त झालेल्या आहेत. या जागांमध्ये भाजपच्या वाट्याच्या ७, दोन काँग्रेस आणि एक जागा राष्ट्रीय जनता दलाची आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले व पियूष गोएल हे लोकसभेवर निवडून गेल्याने भाजपच्या वाट्याच्या या दोन जागा या निवडणुकीतून भरल्या जाणार आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत शिंदे सेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी असल्याने या जागा महायुती मिळून भरल्या जाणार आहेत. या दोन्ही जागांसाठी ‘महायुती’कडे पुरेसे संख्याबळ आहे. परंतु, महायुतीतील सद्याच्या हालचाली पाहाता, सुनेत्रा पवार या बिनविरोध राज्यसभेवर जातात, की अजितदादांना काही दगाफटका होऊ शकतो? हे आता नजीकच्या काळात कळून येईल.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!