खडकपूर्णा प्रकल्पबाधीत पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांची कामे लागणार मार्गी!
– सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी मांडल्या पुनर्वसित गावांच्या समस्या!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – खडकपूर्णा प्रकल्पामुळे देऊळगावराजा तालुक्यातील आठ गावे बाधित झाली असून, या गावांतील पुनर्वसन व नागरी सुविधांची कामे रखडलेली आहेत, तर काहींची दुरवस्था झालेली आहे. या कामांसाठी एकूण ५५ कोटी ४८ लाखांच्या निधीची गरज आहे. हा निधी द्यावा व ही कामे तातडीने मार्गी लावावी, ही मागणी सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात इसरूळचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतिश पाटील भुतेकर व आठ गावांच्या सरपंचांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंत्री पाटील यांनी संबंधित सरपंचांची गुरूवारी मंत्रालयात बैठक लावली होती. या बैठकीत सतिश पाटील भुतेकर यांनी बाधीत गावांच्या समस्यांबाबत अवगत करत, तातडीने निधीची मागणी केली असता, मंत्री पाटील यांनी त्याबाबत सकारत्मकता दाखवत, ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे. त्यामुळे लवकरच नागरी सुविधांची कामे मार्गी लागण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत बाधित होणार्या पुनर्वसित गावठाणमधील नागरी सुविधांची कामे करण्यासंदर्भात पुनर्वसित गावांच्या सरपंचांसमवेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासमवेत गुरूवारी मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली. खडकपूर्णा प्रकल्पामुळे देऊळगावराजा तालुक्यातील एकूण आठ गावे बाधित झालेली आहेत. सदरबाधीत झालेल्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. परंतु सदर कामे पूर्ण करून दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी उलटून गेल्यामुळे या कामांची दुरवस्था झालेली आहे. यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित गावांतील नागरी सुविधांच्या दुरवस्थेबाबत सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी सविस्तर माहिती या बैठकीत दिली. यावेळी सदर गावांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यासंदर्भातील तब्बल ५५ कोटी ४८ लाख रूपये निधीचा प्रस्ताव मंत्री पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला. यावेळी संबंधित अधिकारी तसेच गजानन पवार, गजानन काकड, गजानन डोईफोडे, सतीश भुतेकर, विश्वासराव शिंगणे, प्रभाकर दंदाले, भिकनराव भुतेकर, सचिन कदम, रामेश्वर वायाळ, श्यामसुंदर भुतेकर, प्रदीप सोळंके आदींची उपस्थिती होती.
—————-