मेरा बुद्रूक, ता.चिखली (एकनाथ माळेकर) – शेतातील वीजेचे काम करत असताना अचानक लाईट चालू झाल्याने मेरा बुद्रूक येथील बाप व लेक ठार झाल्याची दुर्देवी घटना मुरदपूर येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
सविस्तर असे, की मेरा बुद्रूक येथील रामेश्वर उत्तम पडघान (वय ४५) व वैभव रामेश्वर पडघान (वय २२) हे दोघे बापलेक मुरदपूर येथील समाधान संतोष गाडेकर यांच्या शेतात वीजेचे काम करत होते. ते काम करत असतानाच अचानक वीज पुरवठा सुरू झाला. त्यामुळे हे दोन्ही बापलेक वीजेच्या तारांना चिकटले गेले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी अंढेरा पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले होते. या दुर्देवी घटनेने मेरा बुद्रूक येथे हळहळ व्यक्त केली जात होती. प्रधान कुटुंबावर मोठे संकट कोसळलेले आहे.
दरम्यान, महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे काही काम चालू आहे, याची कोणतीही कल्पना संबंधित शेतकर्याने आम्हाला दिली नाही. आम्ही नियमाप्रमाणे वीज पुरवठा सुरू केला. याबाबत महावितरणही पोलिसांत तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. संबंधित शेतकर्याने वीजेचा खांब स्थलांतरीत करण्याचे काम या बापलेकाकडून केले होते. झाडाच्या फांद्यात तार अडकल्यामुळे वैभव पडघान झाडावरील तारा मोकळ्या करत असतानाच, वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे तो चिकटला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील रामेश्वर पडघान हे धावून गेले व लाकडी काठीने मुलाला दूर करत असताना जीवंत तारांसह मुलगा खाली कोसळला. त्यामुळे करंट लागून रामेश्वर पडघानही जागीच ठार झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
———-