– मिसाळवाडी, भरोसानंतर आता मेरा परिसरातही चोरटे सक्रीय
मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील मौजे मेरा बुद्रूक येथे दि. १२ जूनच्या रात्री जवळपास ९० ते १०० स्प्रिंकलरच्या तोट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मिसाळवाडी, भरोसा शिवारातूनदेखील यापूर्वी स्प्रिंकलरच्या तोट्या चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. त्याचा तपास अद्यापही अंढेरा पोलिसांकडून लागलेला नसता, मेरा परिसरातही स्प्रिंकलर चोरटे सक्रीय झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावलेला आहे. दरम्यान, चिखली पोलिसांनी मेहकर फाट्यावर काही चोरटे अटक केले असून, त्यांच्याकडे स्प्रिंकलरच्या ताेट्या सापडल्या आहेत. त्यांची या चोरीप्रकरणीदेखील कसून चौकशी सुरू होती.
स्प्रिंकलर तोट्यांची चोरीची माहिती अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांना मिळताच त्यांनी मेरा बुद्रूक येथे येऊन शेतकर्यांच्या शेतामध्ये जाऊन घटनेची पाहणी केली व माहिती घेतली. तसेच, तपास कामाला सुरूवात केली होती. ठाणेदार पाटील यांनी आपल्या खास यंत्रणेच्या माध्यमातून सदर चोरीचा तपास करण्यास सुरुवात केली असता, चिखली येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मेहकर फाटा येथे काही अज्ञात व्यक्तीकडून स्प्रिंकलरच्या तोट्या मिळून आल्याचे त्यांना समजले. त्या अज्ञात व्यक्तीची ठाणेदारांनी चौकशी सुरू केलेली होती. मेरा बुद्रूक, अंत्री खेडेकर या भागांमध्ये स्प्रिंकलर तोट्या चोरीस जाण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आज शेतकरी हा पेरणीसाठी बियाणे व खात आणण्यासाठी पैशाच्या बेतात असतानाच ऐन पेरणीपाण्याच्या वेळेसच शेतातील तोट्या चोरी होणे, ही खूप मोठी चिंतेची बाब ठरलेली आहे. यापूर्वीसुद्धा मेरा बुद्रूक व अंत्रीखेडेकर याशिवारातून स्प्रिंकलरच्या तोट्या चोरीस गेलेल्या आहेत. मिसाळवाडी व भरोसा येथूनही या तोट्या चोरीस गेलेल्या असून, त्याचा तपास अजूनपर्यंत लागलेला नाही. तोच आता नवीन शंभर तोट्या अज्ञात चोरट्यांनी मेरा बुद्रूक शिवारातून चोरीस गेल्याने एकच खळबळ उडालेली आहे.
मेरा बुद्रूक येथील शेतकरी पुंडलिक पडघान यांच्या शेतातील १५, शिवाजी पडघान १७, निखिल पडघान ३०, ज्ञानेश्वर पडघान ८, श्रीकृष्ण पडघान १२, रामदास गावडे ८ अशा शेतकर्यांच्या शेतामधून स्प्रिंकलरच्या तोट्या चोरीस गेलेल्या आहेत. तसेच निखिल पडघान यांच्या शेतामधून दोन दिवसांअगोदरच कोंबड्यासुद्धा चोरून नेण्यात आलेल्या आहेत. चोरीचे प्रमाण असेच चालू राहिले तर शेतकर्याला शेती करणे कठीण होईल, अशी चर्चा शेतकरीवर्गातून होत आहे. तरी अंढेरा ठाणेदारांनी या बाबीकडे लक्ष देवून स्प्रिंकलरच्या तोट्या चोरणार्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
————-