विदर्भ ही मूळात आंदोलनांना जन्म देणारी भूमी. भारतात बिहार अन् महाराष्ट्रात वैदर्भीय संघर्षाचा प्रहार, हा चळवळींचा इतिहासच. वेगळ्या विदर्भासाठी जाबुंबतराव धोटे यांनी केलेली आंदोलनं देशभर गाजली. शरद जोशींनी काढलेल्या शेतकरी आंदोलनांची ठिणगी विदर्भातच पडली, पुढे तिचा महाराष्ट्रात वणवा पेटला. वाङमयीन विश्वात महाकवी कालीदासाचं ‘मेघदूत’ ही जणु विदर्भातील आंदोलनाचे प्रेम अन् विरहपर्व. अध्यात्म काळात राम अन् रामटेकचा वनवास काळातील सहवास. संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचे विचार हे परिवर्तनाचं आंदोलनच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती नागपूरच्या रेशीमबागेतील. नागपूरच्या दिक्षाभूमीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मपरिवर्तन करुन जणु एक धार्मिक आंदोलनच केलं. नामांतर चळवळीत विदर्भातून निघालेला लॉन्ग मार्च, हाच मोठ्या प्रमाणात निर्णायक ठरला होता. मराठा सेवा संघाचं सामाजिक आंदोलन मातृतिर्थ सिंदखेडराजातच झालं.
अशा या विदर्भात धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अन् राजकारणातील अनेक आंदोलनं वारंवार होत राहिली व होत आहे. अजूनही राजकीय व सामाजिक आंदोलनांचे रणशींग विदर्भपंढरी शेगावमधूनच फुंकले जाते. अशा या आंदोलनात्मक प्रवाहात विद्यमान स्थितीत अनेक तरुण चेहरे सामाजिक व राजकीय पटलावर महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यातला एक ‘वाघ माणूस’ म्हणजे विनोद वाघ, हा तरुण जेंव्हा आंदोलनं करतो.. तेंव्हा त्याच्या संघर्षाची डरकाळी अनेक प्रस्थापितांना घाम फोडून हादरवणारी ठरते.
विनोद वाघ, दुर्गम दुसरबीडसारख्या भागातून सामान्य कुटुंबात संघर्ष करत पुढे आलेलं एक सर्वसामान्य व्यक्तीमत्व. शिकून अधिकारी होण्यापेक्षा हुकून हे पोरगं राजकारणी झालं. मराठा सेवा संघाच्या आंदोलनात मनोज वाघ, शेतकरी आंदोलनात रविकांत तुपकर, नागरी समस्यांच्या आंदोलनात हरिश रावळ, बजरंग दलासारख्या कट्टरवादी आंदोलनात अमोल अंधारे अन् राजकीय परिवर्तनाच्या आंदोलनात विनोद वाघ.. हे एकाच पिढीतले नुकतेच मिसरुट फुटलेलं तरुण म्हणण्यापेक्षा ‘टीनएज आंदोलक’.. घरच्या भाकरी खाऊन मामाच्या बकर्या वळणं काय असतं, त्यातली ही पोरं. तशी पोरकट, अजूनही प्रौढ न झालेली. कुठेही भेटलंतरी त्यांच्यातल्या पोरकटपणा जायला तयार नाही. हे जिथून रस्त्यानं जातात त्या रस्त्यात नवरदेवाच्या वरातीचा बँड दिसला की, खाली उतरुन नाचणारे.. ओळख असो वा नसो!
२००० नंतरचा तो काळ, त्यावेळी व अजूनही बुलडाणा जिल्ह्यात वर्तमानपत्रांचा बादशहा म्हणजे ‘देशोन्नती’.. याच वृत्तपत्रात त्यावेळी व अजूनही मी जिल्हा प्रतिनिधी. वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न, त्यांचाही व माझाही. मोठमोठे नेते व प्रस्थापितांच्या बातम्या सर्वच छापतात, आपण या पोट्ट्या-सोट्ट्यांच्या बातम्या छापत जावू.. असं ठरवलं. यांनी केलेली आंदोलन ‘देशोन्नती’च्या पहिल्या पानावर छापून यायला लागली, यांनी पुकारलेला लढा वार्तापत्रातून पुढे आणू लागलो. एक माहौल तयार केला, जिल्हाभर या तरुण आंदोलकांचा. पुर्वी कसं होतं, जो जाहीरात देईल त्याचीच बातमी यायची.. पण खिशात दमडी नसतांनाही या तरुणांच्या बातम्या मोठ्या फोटोसह रंगीत छापून यायला लागल्या. त्यामुळे त्यांचे आंदोलनात्मक बळंही वाढत गेले. पाठीवर थाप मारणारा असणारा दहा हत्तीचं बळ येतं, याची जाणीव सर्वच आंदोलकांना आली. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात आंदोलनांचे जणु वारेच वाहायला लागले. हे पाहून राजकीय पक्षही ‘रेस्ट हाऊस कल्चर’मधून बाहेर पडून रस्त्यावर आले. अन् या सर्वांचा आवाज बनला अर्थात, देशोन्नती!
थर्टीफस्ट होता, त्यादिवशी सर्वत्र जल्लोष सुरू असतो. २० वर्षांपुर्वी याचदिवशी विनोद वाघ, मनोज वाघ व रविकांत तुपकर जिल्हा बँक घोटाळ्याविरुध्द पहिल्यांदा पाण्याच्या टाकीवर चढले होते, नंतर टॉवरवर.. या ‘शोले स्टाईल’ आंदोलनाने धूम मचवली होती. दुसर्यादिवशी ‘देशोन्नती’मध्ये ‘टॉवरवर चढून वाघाचा थर्टीफस्ट’ अशी बातमी ठळक मथळ्यात बातमी झळकली, अन् रातोरात विनोद वाघ आंदोलनातला हिरो झाला. पुढे अनेक आंदोलने झालीत, शेतकरी-कष्टकरी-तरुणांच्या प्रश्नांसाठी विनोद रस्त्यावर येत राहिला. त्याच्या बातम्याही येत राहिल्या. आतातर फेसबुक-व्हॉटस् अॅप-इन्स्टाग्राम सारखा सोशल मिडीया आहे. त्यातून विनोद वाघांचे ‘स्टारडम’ नेहमीच दिसत असते. प्रस्थापितांविरोधात ३ वेळा विनोद जिल्हा परिषद निवडणूक ‘डंके की चोटपर’ जिंकला. धनशक्ती विरुध्द जनशक्ती जिंकत गेली. विधानसभा दोनदा लढला, ताकद दाखविली मात्र यश मिळू शकले नाही. जातीपेक्षा माती महत्वाची, म्हणून कधीच जाती-धर्माचा आधार विनोदने घेतला नाही. मनसेस्टाईल आंदोलन, ही व्याख्या राज्यात फेमस करणारा विनोद वाघ हा आंदोलनाला खळखट्ट्याकच.. पुढे प्रविण दरेकर सोबत हा मनसेचा वाघ भाजपात गेला. आता तो भाजपाच्या शांत व संयमी प्रवृत्तीतही रुळलेला दिसतो. तरी म्हणतात ना, सुंभ जळलातरी पीळ जात नाही.. तसाच आंदोलनात्मक पिळदारपणा विनोद वाघचा मधून-मधून उफाळून येतोच. चांगला ‘वक्ता’ असल्याने भाजपाने विनोदला ‘राज्य प्रवक्ता’ केलंय, तिथंही तो पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडतोच. असा हा ‘जंगलराज’ खपवून न घेणारा, आंदोलनातला वाघ..
विनोद वाघाची डरकाळी म्हणूनच ठरते ती, प्रस्थापितांना हादरवणारी.. अशा विनोदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
(लेखक हे दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी तथा ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे सल्लागार संपादक आहेत. संपर्क 9822593923)