Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

सिंदखेडराजातील आंदोलनाआडून तुपकरांनी ‘महायुती’ला लावला ‘ढाक’!

– सिंदखेडराजाच्या आखाड्यात शेतकरी आंदोलनाआडून विधानसभेची रणनीती?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – सोयाबीन, कापसाची दरवाढ, पीकविमा व शेतकरीहिताच्या मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्यातील एकनाथ शिंदे सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर तुपकरांकडून अशाकाही आंदोलनाची अपेक्षा होतीच; परंतु, त्यांनी राज्यात २५ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांचे पुढील आंदोलन मुंबईतच होईल, अशी अपेक्षा असताना त्यांनी सिंदखेडाराजाची निवड केली आहे. विधानसभेच्या आखाड्यात रविकांत तुपकर हे स्वतः उतरणार असून, त्यांनी काही मतदारसंघांचा सर्व्हे केला होता. त्यात सिंदखेडराजा मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित आला होता, असे खात्रीशीर सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सिंदखेडराजातील अन्नत्याग आंदोलनाआडून त्यांनी महायुतीला व खासकरून विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यापुढे कुस्तीतील ‘ढाक डाव’ टाकला आहे. या डावाला डॉ. शिंगणे कसे उलटवतात? हे राजकीय आखाड्यात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कुस्तीशौकिनांना माहिती असेल की, हनुमंती कुस्तीत एक महत्वपूर्ण असा ‘ढाक डाव’ आहे. हा डाव अतिशय चपळतेने, कमी ताकदीने आणि जास्त बुद्धीने टाकायचा असतो. हा डाव बरोबर बसला तर १०० टक्के पुढचा प्रतिस्पर्धी पैलवान पराभूत होतो. लोकसभा निवडणुकीत सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघातून तुपकरांना जोरदार लीड मिळालेला आहे. तसेच, या भागातील वंजारी समाजाने तुपकरांना मनापासून साथ दिलेली आहे. तसेच, स्वतः तुपकरांनी काही मतदारसंघांचा खासगी सर्व्हे केला असता, त्यात सिंदखेडराजा हा सुरक्षित मतदारसंघ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून कळते आहे. त्यामुळे आता पीकविमा, शेतीपिकांची नुकसान भरपाई, सोयाबीन व कापसाला दरवाढ यासह इतर शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी तुपकरांनी जेव्हा आंदोलनाही हाक दिली, तेव्हा त्यांनी मुद्दामहून सिंदखेडराजा हा मतदारसंघ निवडला आहे. सद्या या मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजीची लाट आहे. मंत्रीपद, आमदारकी, जिल्हा बँक, सहकारी संस्था ताब्यात असतानाही डॉ. शिंगणे यांना या मतदारसंघाचा विकास करता आला नाही. त्यांच्यानंतर आमदार झालेल्या श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली शहरासह मतदारसंघाचा; आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहराचा चेहरामोहरा बदलला; परंतु डॉ. शिंगणे यांना मात्र सिंदखेडराजा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलता आला नाही. त्यामुळे डॉ. शिंगणे यांच्याविषयी या मतदारसंघात नाराजीची लाट दिसून येते आहे.
त्यातच, मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर व बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर या मतदारसंघातील जातीय समिकरणेदेखील कमालीची बदलली आहेत. वंजारी समाजातून कुणीही एकच एक उमेदवार उभा राहिला तर हा समाज त्यांना मतदान करण्याच्या मानसिकतेत असून, समाजाच्या मतांची फूट होत असेल तर हा समाज एकगठ्ठा रविकांत तुपकर यांना मतदान करू शकतो, अशी राजकीय चिन्हे आहेत. त्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणाचा अचूक फायदा उचलण्यासाठी रविकांत तुपकर यांनी अतिशय चाणाक्षपणे सिंदखेडराजा शहराची अन्नत्याग आंदोलनासाठी निवड केली असल्याची राजकीय चर्चा आहे. या आंदोलनाला व्यापक रूप देऊन ते मतदारसंघातील गावागावांत आंदोलनाची धग पोहोचविण्याची शक्यता असून, त्यांच्या आंदोलनाचे यश हे मतांत परावर्तीत करण्यासाठी त्यांची राजकीय रणनीती राहू शकते. त्यामुळे आंदोलन शेतकरीहिताच्या मुद्द्यावर असले तरी, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कुस्तीतील ‘ढाक डाव’ टाकणारे असून, राजकीय आखाड्यात या डावाला तोड देण्यासाठी डॉ. शिंगणे यांना आता प्रतिडाव टाकावा लागणार आहे.
———–

काका-पुतणीच्या लढाई तुपकरांना विजयाची खात्री!

गायत्री शिंगणे यांना शरद पवारांकडून कामाला लागण्याचे आदेश.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विधानसभा निवडणुकीसाठी आधीच घरातूनच आव्हान मिळालेले आहे. त्यांच्या पुतणी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती आघाडी नेत्या गायत्री शिंगणे यांनी विधानसभेसाठी कंबर कसली असून, त्यांना शरद पवार यांनी आपले आशीर्वाद दिलेले आहेत. गायत्री शिंगणे यांना या मतदारसंघात जोरदार प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे रविकांत तुपकर जर सिंदखेडराजाच्या आखाड्यात उतरले तर त्यांना डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह गायत्री शिंगणे यांचेदेखील आव्हान पेलावे लागणार आहे. एक तर काका-पुतणीच्या लढाईत तुपकर हे बहुमताने विजयी होतील; किंवा त्यांचा दारूण पराभवदेखील होऊ शकतो. लोकसभेसाठी सिंदखेडराजावासीयांनी तुपकरांना मते दिलीत, म्हणजे विधानसभेलाही ते मिळतील, असा राजकीय अंदाज बांधणे तसे चुकीचे आहे. कारण, विधानसभेची गणिते वेगळी असतात. तरीही तुपकरांच्या डोक्यात काय आहे, हे नजीकच्या काळात निदर्शनास येईलच! तथापि, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आधीच या मतदारसंघातून गायत्री यांना विधानसभेसाठी कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात रविकांत तुपकरांचे गायत्रीताईला राजकीय आव्हान उभे राहिलेच, तर ते थेट शरद पवारांना राजकीय आव्हान ठरणार आहे. कुस्ती जोपर्यंत  राजेंद्र शिंगणे-रविकांत तुपकर यांच्यात आहे, तोपर्यंत ठीक आहे. परंतु, हा आखाडा गायत्रीताईंकडे सरकला तर मात्र कुस्तीतील ‘महावस्ताद’ या आखाड्यात उतरू शकतो. या ‘वस्तादा’ला आजपर्यंत तरी राज्याच्या राजकीय आखाड्यात कुणी चितपट करू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!