– पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये डांबण्याची धमकी देणे व खंडणी मागणे याबाबतची तक्रार बिलाल शाह (रा. डोणगाव) या तरूणाने डोणगाव पोलिस ठाण्याचा जमादार सतिश मुळे याच्याविरोधात दिली होती. या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने व मुळे हा वारंवार त्रास देत असल्याने अखेर पीडित शाह याने बुलढाणा येथे जाऊन पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले.
आत्मदहनाचा प्रयत्न करणारा बिलाल मोहसीन शाह या तरूणाने सांगितले, की डोणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हेड कॉन्स्टेबल सतिश मुळे हा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची वारंवार धमकी देत होता. तसेच, खंडणीचीही मागणी करत होता. याबाबत आपण वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे तक्रारही केली होती. परंतु, या तक्रारीची काहीही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे मुळे हा चिडून आणखी त्रास देऊ लागला. त्यामुळे आपण जीवन संपविण्याचा निर्णय घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाच्या प्रयत्नाची ही घटना आज दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेने बिलाल शाह यांचा जीव वाचू शकला. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक हे डोणगाव पोलिस ठाण्यातील जमादार सतिश मुळे याच्यावर काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
———-