बिबी (ऋषी दंदाले) – भरधाव असलेल्या दुचाकी व ऑटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, इतर चार प्रवासी जखमी झाले होते. काल सायंकाळी ही दुर्देवी घटना लोणार तालुक्यातील किनगावजट्टू गावाजवळ घडली. जखमींना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे जालना येथे हलविण्यात आले होते. याप्रकरणी बिबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे, की उमरखेड डिंडाळा ता. यवतमाळ येथील जाधव कुटुंबीय हे मुंबईवरुन ऑटो क्रमांक एमएच ०४ एलएक्स २५७० ने उमरखेड डिंडाळा ता.यवतमाळकडे जात होते. त्यादरम्यान लोणार तालुक्यातील किनगावजट्टू गावाजवळ काल, दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान ऑटो आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटरसायकल क्रमांक एमएच २८ एएक्स ०३७७ वरील प्रदीप मुळे, वय ३५ वर्ष रा. खंडाळा, ता. लोणार व ऑटोमधील संजय राठोड वय वर्ष २५ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही दोन्हीही वाहने वेगात होती, असे सांगण्यात आले. ऑटोमध्ये एकूण ६ लोक प्रवास करत होते. त्यामध्ये दोन लहान मुले, नैतिक जाधव वय वर्ष ४ आणि वैष्णवी जाधव वय वर्षे ५ यांचा समावेश आहे. त्या दोन लहान मुलांना जास्त मार लागला नाही. मात्र ऑटोमधील बालाजी जाधव वय वर्ष २७, पुष्पा बालाजी जाधव वय वर्षे २०, ओम जाधव वय वर्षे १९, संजय राठोड वय वर्षे २५ हे जखमी झाले आहेत. हा अपघात झाला त्यावेळी किनगावजट्टू येथील स्थानिक नागरिकांनी व बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली, व सर्व अपघातात जखमी झालेल्यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय बिबी येथे पोहोचवले. बिबी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अॅम्बुलन्सद्वारे जालना येथे हलविले होते. पुढील तपास बिबी पोलीस करत आहेत.