Breaking newsHead linesMaharashtraNagpurPolitical NewsPolitics

Breaking News! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव!

– उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस, राजकीय घडामोडींकडे राज्याचे लक्ष

नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – महाविकास आघाडीकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असून, याबाबतचे पत्र आज विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील या सदस्यांनी दिले आहेत. या अविश्वास पत्रावर महाविकास आघाडीच्या एकूण ३९ आमदारांच्या सह्या आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या (दि.३०) संपत आहे. त्याच्या एक दिवस अगोदर महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस विधिमंडळ सचिवांना देण्यात आल्याने, ही राजकीय खेळी आहे, की व्यूहरचना आहे, असा प्रश्न नागपुरात उपस्थित होत होता.

हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वीच महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्तावाचे पत्र देण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. अध्यक्ष बोलू देत नाही, अशी तक्रार आमदारांची होती. त्यामुळेच विरोधकांनी ही भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार, माजी मंत्री जयंत पाटलांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणातही सत्ताधारी पक्षाकडून जवळपास १४ आमदारांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, विरोधकांकडून केवळ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाच बोलण्याची संधी मिळाली होती. त्यावेळीही विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दरम्यान, विरोधकांची मुस्काटदाबी केली जात असल्याचे सांगताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव सभागृहात म्हणाले, ‘आपण आम्हाला प्रत्येक वेळी सांगत असता की हे सभागृह नियमाने चालले पाहिजे. आपण सातत्याने नियमाचा उल्लेख करत असता. सर्वसाधारणपणे असा कोणी एखादा सदस्य सभागृहात वक्तव्य करत असेल, आणि त्याच्या वक्तव्याबद्दल जर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला तर पहिल्यांदा हरकतीचा मुद्दा मांडायला संधी दिली जाते. तो हरकतीचा मुद्दा व्हॅलिड असेल तर मान्य करा, किंवा फेटाळून लावा. पण हरकतीचा मुद्दाच उपस्थित करायला तुम्ही संधी देत नाही, हे योग्य नाही. मुळात २९३ च्या प्रस्तावाची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. त्यानंतर सन्माननीय सदस्यांना आपण बोलायला दिले, त्यांना कुठल्या नियमानुसार आपण बोलायला दिले, हा आता माझा हरकतीचा मुद्दा आहे. सभागृहात आलेल्या विषयांवर चर्चा नाही. कधीही कोणीही उठायचे आणि बोलायचे हे चाललंय काय? अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना जाब विचारला.

आज नागपुरात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर, सदस्य सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपूडकर आणि अनिल पाटील यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीसवजा पत्र विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे दिले. राजेंद्र भागवत हे आता पत्रावर निर्णय घेणार आहेत. या पत्रावर महाविकास आघाडीच्या ३९ हून अधिक आमदारांच्या सह्या असल्याची माहिती आहे. दरम्यान, २०१६ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, अविश्वास ठरावाची नोटीस आली असेल तर अध्यक्षांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे आता राहुल नार्वेकर यांच्या अधिकारांवर मर्यादा आल्याची चर्चा आहे. तसेच, भाजप व शिंदे गटाकडे बहुमत असल्याने हा अविश्वास ठराव पारित होतो की नाही, याकडेदेखील राज्याचे लक्ष लागलेले आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!