विधानपरिषदेसाठी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर!
– ३० जानेवारीला मतदान, २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून, नाशिक, अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद व कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, ३० जानेवारीला मतदान, तर २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर झाली आहे. या मतदारसंघात कोण बाजी मारणार, हे पाहावे लागणार आहे.
तसेच, आगामी शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी पक्ष आणि महाविकास आघाडीकडून कुणाकुणाला उमेदवारी किंवा पाठिंबा मिळतो, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे. शिक्षक मतदारसंघात आपल्या उमेदवाराला संधी मिळावी, यासाठी प्रत्येक पक्ष आग्रही राहण्याची शक्यता आहे. राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठीची ही निवडणूक प्रचंड चुरशीची होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या निवडणुकीसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
————-