– वीरपांग्रा तलावातून दुपारी बारा वाजता पाणी सोडण्याची तयारी!
बिबी (प्रतिनिधी) – चोरपांग्रा येथील वीरपांग्रा तलावातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर जलसंधारण विभाग हादरला असून, तातडीने कॅनॉलच्या कामाला सुरूवात करत पाणी सोडण्याचेदेखील मान्य केले आहे.
लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील वीरपांग्रा तलावातून कॅनॉलद्वारे किंवा नाल्याद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी शेतकर्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना निवेदनाद्वारे लेखी मागणी केली होती. परंतु प्रशासनाच्यावतीने दखल न घेतल्याने सहदेव लाड यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे यांना दूरध्वनीद्वारे आज दिनांक २९ डिसेंबरला चोरपांग्रा तलावातून पाणी न सोडल्यास शेतकर्यांसह जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता.
जलसमाधी आंदोलनाच्या धस्क्याने जिल्हा जलसंधारण प्रशासनाने तात्काळ चोरपांग्रा येथील वीर पांग्रा तलावावर जाऊन कॅनॉलची दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात केली, व उद्या दुपारी बारा वाजता कॅनॉलमधून पाणी सोडण्याचे आश्वासन जलसंधारण लिपिक काळुसे यांनी जलसंधारण विभागाच्यावतीने दिले, व कॅनलच्या दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात केली. त्यामुळे सहदेव लाड यांनी त्यांचे आंदोलन स्थगित केले. तलावाचे पाणी कॅनॉलद्वारे व नाल्याद्वारे शेतकर्यांना मिळणार असल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.
——————